आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून गंभीर दखल
प्रतिनिधी/ पणजी
मागील 15 ऑक्टोबरपासून गोव्यातील सर्व व्यवहार अनलॉक 5.0 नुसार सुरु करण्यात आल्यानंतर नाईट क्लबमधून चालणाऱया रात्रीच्या पाटर्य़ांना ऊत आला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारीत होत आहेत. त्यात सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्क वापरला जात नाही. या साऱया प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अशा क्लबांचे परवाने निलंबित तसेच रद्द करण्याची मागणी केली आहे. विरोधकांनी, तसेच सामाजिक संघटनांनीही याबाबत असंतोष व्यक्त करुन या पाटर्य़ांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे कोरोनाचे संक्रमण कमी होत असताना आणि डॉक्टर्स, नर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांचे जीव वाचावेत म्हणून प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे अशा पाटर्य़ा कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास पुन्हा कारणीभूत ठरु शकतात, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

कोरोनामुळे गोव्यातील नाईट क्लबमध्ये चालणाऱया रात्रीच्या पाटर्य़ा गेले अनेक महिने बंद होत्या. आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार बंद असलेले सर्व उद्योग पुन्हा सुरु करण्यास मान्यता मिळाल्याने गोव्यातही नाईट पाटर्य़ांचा धुमधडाका पुन्हा सुरु झाला आहे. त्यांचे व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात प्रसारीत होत असल्याने राणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.
कोरोना मार्गदर्शक तत्वांचा फज्जा
या नाईट पाटर्य़ांमध्ये तरुणांची मोठी गर्दी दिसत असून तेथे कसलेही सामाजिक अंतर पाळण्यात येत नाही. शिवाय मास्कचा वापरही होत नाही असे आढळून आले आहे. अशा पाटर्य़ांवर नियंत्रण ठेवणारी आणि तेथे मार्गदर्शक तत्वांचे पालन होते की नाही यावर लक्ष देणारी कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नाही. त्या पाटर्य़ा रात्री उशिरा होत असल्याने आणि त्यास मान्यता मिळाल्याने त्यांना कोणी आक्षेपही घेऊ शकत नाही. आक्षेप घेणारेच अडचणीत येण्याची शक्यता असते.
पोलिसांकडूनही होत नाही कारवाई
पोलिसांना त्या पाटर्य़ा माहीत असतात परंतु तक्रारी नसल्यामुळे ते काही करीत नाहीत. परिणामी अशा पाटर्य़ांवर कारवाई होत नाही. चुकून एखाद्या – दुसऱया पार्टीवर कारवाई होते. गोवा राज्यातील नाईट लाईफ पुन्हा एकदा सुरु झाले असून किनारपट्टी भागात असलेल्या नाईट क्लबमध्ये या पाटर्य़ा आता खुलेआम होत असल्याचे सोशल मीडियातून समोर आले आहे. पोलीस अशा पाटर्य़ांवर स्वतःहून कोणतीच कारवाई करत नसल्याबद्दल पोलिसांचे आणि सरकारचे या पाटर्य़ांना आशीर्वाद आहेत काय, असा संभ्रम जनतेत निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती
पर्यटनाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि गोव्यातील पर्यटन वाढले पाहिजे हे जरी खरे असले तरी कोरोनाचे नियम झुगारुन ते करणे चुकीचे ठरत आहे. ते नियम पाळूनच पर्यटनाचे काम चालले पाहिजे नाहीतर गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती राणे यांनी प्रकट केली आहे.
मुख्यमंत्री या विषयी गंभीर दखल घेतील आणि ते जिल्हाधिकाऱयांना योग्य ते निर्देश देतील तसेच त्या क्लबवर कारवाई करतील अशी आशा राणे यांनी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ती कारवाई झाली पाहिजे असे मत राणे यांनी वर्तवले आहे.
नियम, अटींचे पालन सर्वांनी करावे
पर्यटक तसेच नाईट क्लबसाठी राज्य सरकारने एसओपी तयार करुन ती काटेकोरपणे लागू करण्याची व राबविण्याची गरज असल्याचे मत विश्वजित राणे यांनी व्यक्त केले आहे. पर्यटकांना देखील त्यामुळे कोरोनाची बाधा होऊ शकते आणि ती वाढू शकते याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम, अटी न पाळल्याने पर्यटकांसह गोव्यातील जनतेला देखील कोरोनाचा धोका उत्पन्न होऊ शकतो.
पाटर्य़ा करणाऱयांचे परवाने रद्द करावेत : आरोग्यमंत्री राणे
विश्वजित राणे यांनी या प्रकरणी चिंता प्रकट केली असून हा विषय घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज असून कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविणाऱया त्या क्लबांवर कारवाई व्हायला हवी. त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असे राणे यांनी नमूद केले आहे.
नाईट पाटर्य़ांमध्ये देशी पर्यटकांचा भरणा
गोव्यात मोठय़ा प्रमाणात देशी पर्यटक येत असून ते या नाईट क्लबमध्ये आणि तेथील पाटर्य़ात सहभागी होत आहेत. प्राप्त माहितीनुसार अशा बऱयाच पाटर्य़ांचे मार्केटिंग पुणे, मुंबई येथून होत आहे. काही स्थानिक लोकही अशा पाटर्य़ाना सहकार्य करतात, तसेच काहीजण भागही घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे कोरोनाचे नियम गुंडाळून पाटर्य़ा होणे धक्कादायक असून शनिवारच्या रात्री सदर पाटर्य़ा मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.









