आपत्कालीन प्रसंगी सूचना देणार
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग पोलीस विभागामार्फत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर आता बाजारपेठेत व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, दंगल यावर नियंत्रण ठेवतांना नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी शहरात ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्याच्या जोडणीचे काम ठेकेदारामार्फत युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरातील चौकाचौकात, शहराच्या हद्दीच्या ठिकाणी गृह विभागामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे यंत्रणेमुळे सावंतवाडी पोलिसांना शहरात घडणाऱया मारहाण, अपघात, चेन स्नॅचिंग, चोरीच्या गुन्हय़ांचा उलगडा होणार आहे. या जोडीला नव्याने सीसीटीव्ही कॅमेऱयासह ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे जिल्हा पोलीस विभागाच्या कंट्रोल रुममधून लक्ष राहणार आहे. बाजारात एखाद्या कारणावरून होणारी गर्दी, दंगल घडल्यास त्याचे चित्रीकरण पाहता येणार आहे. त्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देऊन गर्दी व दंगलीवर नियंत्रण देण्याची सूचना देण्यात येणार आहे. तसेच तत्काळ जिल्हा पोलीस यंत्रणेकडून ध्वनीक्षेपक यंत्रणेमार्फत नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच सार्वजनिक सूचनाही या ध्वनीक्षेपक यंत्रणेकडून देण्याची व्यवस्था होणार आहे.
सध्या सावंतवाडी शहरात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत, त्या ठिकाणी जादा कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. विशेषत: नरेंद डोंगर, बस स्थानक, पोलीस स्टेशन, आयटीआय नाका, नवीन शिरोडा नाका, नगरपालिका आदी अकरा ठिकाणी कॅमेरे बसवून संपूर्ण शहरावर जिल्हा पोलीस यंत्रेणेचे लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर मळगाव बाजार, रेल्वे स्टेशन, आंबोली या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. या सर्व कॅमेऱयांद्वारे केबल नेटवर्क माध्यमातून सर्व यंत्रणा जिल्हा पोलीस कंट्रोल रुमला जोडण्याचे काम सुरू आहे. या सर्व यंत्रणेचा सावंतवाडी पोलिसांना मोठय़ा या गुन्हयाच्या तपास कामासाठी व पुराव्यासाठी फायदा होणार आहे. विशेषता रात्रौच्यावेळी घडणाऱया गुन्हयांसाठी सिसिटिव्ही कॅमेरे फायदेशीर ठरणार आहे.









