पुणे / प्रतिनिधी :
पोलीस असा घटक आहे की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपला त्यांच्याशी संबध येतो. पोलीस खात्यामध्ये काम करताना कष्ट करण्याची आणि कोणत्याही वेळी मदतीला धावून जाण्याची तयारी असली पाहिजे. त्याचबरोबर संयम ठेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. दैनंदिन कायदा सुव्यवस्थेत राज्यातील अथवा देशातील पोलीस विभागाची संख्या पाहिली असता या कामात मर्यादा येऊ शकतात. परंतु पोलीस मित्रांच्या सहकाºयामुळे कायदा सुव्यवस्था राखणे अतिशय सोपे होते. अनेक अवघड गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस मित्रांच्या मदतीमुळे ते गुन्हे सोडविण्यास मदत होते. तसेच पोलीस घटनास्थळी पोहचण्याआधी पोलीस मित्रांच्या सर्तकतेमुळे गुन्हेगार सापडतो. अनेकदा मोठे गुन्हे पोलीस मित्रांच्या दक्षतेमुळे टळतात असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) दत्तात्रय मंडलिक यांनी व्यक्त केले.
पोलीस मित्र संघातर्फे पोलीस मित्र गौरव पुरस्कार २०२० व पोलीस मित्र दिनदर्शिका प्रकाशन सोहळ््याचे आयोजन नवी पेठेतील निवारा सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, विद्या जाधव, पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मंडलिक, वर्षा मंडलिक, अकबर मेनन, जयराज लांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला आणि पोलीस मित्र दिनदर्शिका २०२० चे प्रकाशन तसेच मोफत वितरण देखील करण्यात आले.









