काही महाविद्यालयांनी परीक्षा पुढे ढकलल्या
प्रतिनिधी / बेळगाव
शहर व जिल्हय़ातील काही महाविद्यालयांमध्ये गुरुवारपासून प्रॅक्टीकल परीक्षांना सुरुवात झाली आहे. गुरुवारीदेखील महाविद्यालयांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुदैवाने शहर व जिल्हय़ात परीक्षेच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
हिजाब प्रकरणावरून गेल्या तीन दिवसांपासून महाविद्यालये बंद होती. पण या महाविद्यालयांना परीक्षा घेणे आवश्यक वाटत असल्यास घ्याव्यात. त्यासाठी महाविद्यालय प्रशासनानेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तरतूद करावी, असे सूचविण्यात आले होते. त्यानुसार काही महाविद्यालयांनी सकाळी 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत प्रॅक्टीकल परीक्षा घेतल्या. त्या सुरळीत पार पडल्या. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासनाचा जीव भांडय़ात पडला.
लिंगराजसह अन्य काही महाविद्यालयांनी मात्र आजची परीक्षा रद्द केली. व्यवस्थापनाची बैठक घेऊन नव्याने वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर यांनी सांगितले.
अनेक महाविद्यालयांनी संबंधित विद्यापीठांकडे गुरुवारपासून परीक्षा घेण्यासंदर्भात माहिती पाठविली होती. पण अचानक हिजाब प्रकरणामुळे महाविद्यालये बंद झाल्याने वेळापत्रक कोलमडणार असल्याची चिंता महाविद्यालय व्यवस्थापनांना लागली आहे.
ज्योती महाविद्यालयासह अन्य काही महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत. पोलीस बंदोबस्तात व्यवस्थापनांनीही त्यांचे सुरक्षा रक्षक तैनात केले होते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तरीही ज्या महाविद्यालयांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. त्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रौढ शिक्षण खात्याने केले आहे.
प्रतिक्रिया
परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार
प्रॅक्टीकल परीक्षांना विद्यार्थी संख्या खूप कमी असते. पण तरीही धोका पत्करता येत नाही. त्यासाठी आमच्या व्यवस्थापनाने परीक्षा रद्द केल्या. वेळापत्रक कोलमडणार असले तरी व्यवस्थापनाची बैठक घेऊन परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
डॉ. ज्योती कवळेकर, प्राचार्या लिंगराज कॉलेज
परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत
पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहेच, शिवाय महाविद्यालय व्यवस्थापनानेही स्वतंत्र सुरक्षा रक्षक नियुक्त केले असल्याने धोका अथवा तणाव उद्भवण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यापीठास कळविल्याप्रमाणे परीक्षा घेत आहोत. परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत पार पडला.
प्रा. आनंद पाटील, ज्योती कॉलेज
विद्यापीठांची भूमिका अस्पष्ट
महाविद्यालयांचे ‘वर्किंग डे’ यापूर्वीच संपले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे अपरिहार्य आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी वेळापत्रक विद्यापीठांकडे पाठवून मंजुरी मिळविली होती. याच दरम्यान हिजाबवरून वातावरण तापल्याने परीक्षांबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. विद्यापीठांनी परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती पण ती नेहमीप्रमाणेच अस्पष्ट आहे, असे प्राचार्य आणि प्राध्यापकांचे म्हणणे आहे.









