– जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले बोंबाबोंब आंदोलन
प्रतिनिधी / सोलापूर
विजापूर नाका पोलीस कोठडीतून उपचाराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या भिमशा काळे यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला, असा आरोप करीत सोलापूर आणि उस्मानाबाद येथील भिमशा काळे यांच्या नातेवाईकांचा व पारधी समाजातील नागरिकांचा मोठÎा संख्येने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश पाहावयास मिळाला. यावेळी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. संबंधित एपीआयवर गुन्हा दाखल करून अटक करा व पीडित कुटुंबाचे प्रशासनानेही पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आली.
पोलीस कोठडीत पारधी समाजाच्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर आणि उस्मानाबाद येथून भिमशा काळे यांचे नातेवाईक व पारधी समाज यांची एकच गर्दी जमू लागली. बाराच्या सुमारास मोठÎा प्रमाणात पारधी समाजाच्या आक्रोश बघावयास मिळाला. पोलीस प्रशासनाविरोधात, जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाचा फौजफाटा दिसून आला. जिल्हाधिकारी शंभरकर न आल्यामुळे पारधी समाजातील युवक, महिलांनी बोंबाबोंब आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला. प्रसंगी लाठÎा खाऊ, अंगावर गोळ्या झेलू पारधी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पोलीस प्रशासन हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी शंभरकर दाखल झाल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. पारधी समाजातील महिलांचा आवाज पुन्हा वाढला व घोषणा देण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांना येऊ न दिल्यामुळे दरवाजा आपटत व हंबरडा फोडत नागरिकांनी आपला आक्रोश दाखवला.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शेवटी पारधी समाजातील सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यानंतर पारधी समाजाने ऐकले नाही. तोपर्यंत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बसून राहण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे यांचे मोठÎा संख्येने पारधी समाज, सहकारी जमले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
`या’ घोषणांनी परिसर दणाणून गेला
पोलीस प्रशासन हाय हाय, जिल्हा प्रशासनाचा निषेध असो, एपीआय कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गोळ्या घाला, लाठी मारा, पण आम्हाला न्याय द्या, पारधी समाजाला न्याय द्या अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट
कुर्डुवाडी येथील पारधी तरुण पोलिस कस्टडीच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे. पारधी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सोलापुरातील ही तिसरी घटना आहे. प्रत्येक वर्षाला एक पारधीचा पोलीसच्या मारहाणीमध्ये मृत्यू होतो. ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. घोटाळे करणारे बाहेर राहतात. मात्र गरिबावर अन्याय होतो. संबंधित पोलिसांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करावी, ऍट्रॉसिटी दाखल करावी, पीडित कुटुंबाची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने उचलावी.
पोलिसावर गुन्हा दाखल करा
पारधी समाजावर सतत अत्याचार वाढला आहे मृत्यू होत आहेत. इतर समाजाचा तरुण असला असता तर काय झाल असते, पारधी समाजाचा तरुण असल्यामुळे ऍक्शन घेत नाहीत. खोटे गुन्हे दाखल करतात. संबंधित पोलिस अधिकाऱयावर गुन्हा दाखल करा. लेखी द्या अन्यथा न्याय मिळेपर्यंत खालीच बसून राहतो. – राजेश काळे, नगरसेवक
निःपक्ष चौकशी करून कारवाई करू
पारधी समाजाच्या भावना तीव्र आहेत. या प्रकरणाची सखोल माहिती घ्यावी लागेल. हा तपास सीआयडीकडे गेला आहे. चर्चा चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल. निपक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
मला न्याय द्या
पारधी आहे आणि तो गुन्हेगारच आहे असे समजून पोलिसांनी कोठडीत असताना त्याला बेदम मारहाण केली. मला सात मुले आहेत, पती गेला. आता सारे जण रस्त्यावर आलो आहेत. मला न्याय द्या. – भिमशा काळे यांची पत्नी
भिमशा काळे यांच्यावर चोरीचे विविध गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल झाले. संशयावरून त्यांना कुर्डुवाडी पोलिसांकडून विजापूर नाका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. तपास करताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. – काळे यांचे वकील
राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपास
गुह्याच्या तपासाकरीता चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशिताचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान रविवारी भिमशा काळे याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईंकांनी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करीत संबंधित पो†िलसांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान या गुह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वषेण विभागाकडे देण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वषेण विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे सोमवारी सकाळी सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कार्यालय सील केले असून काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.









