लातूर : प्रतिनिधी
पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा होताच जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी पोलीस अधिकारी व मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
पोलीस सेवेत दक्षपणे सेवा देणारे पोलीस निरीक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना साहित्याची आवड आहे. पोलीस क्षेत्रात त्यांची 28 वर्ष सेवा झाली. ते सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. मिळालेल्या पोलीस विभागातील या सर्वच पुरस्काराअगोदर त्यांना यापुर्वी विशेष सेवापदक, आंतरीक सुरक्षा पदक, पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पुरस्कार आदि महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 28 वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्याची उकल, तपास, दोषारोप आदि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 53 प्रशंसनीय पत्र व 410 अॅवॉर्ड बक्षीस स्वरूपात मिळालेली आहेत. 1983 साली ते पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले होते. त्यांनी यापुर्वी भंडारा, गोंदिया, नांदेड, बीड, परभणी पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथे सेवा बजावली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.









