प्रतिनिधी/मिरज
मित्राच्या विरोधात मारहाणीची तक्रार देण्यासाठी आल्यानंतर पोलीस ठाण्यातच पेटवून घेतलेल्या सरफराज महंमदअली जमखडीकर (वय २६) या तरुणाचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री दीड वाजता नशेच्या अवस्थेत सरफराज याने पेटवून घेतले होते. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तो ७० टक्के भाजला होता. त्याचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सरफराज जमखंडीकर हा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी आला होता. तो नशेत होता. यासीन, अबुबकर आणि आयुब अशा तिघांनी मारहाण केली आहे. त्यांना आत्ताच अटक करा, असे तो म्हणून दंगा करीत होता. त्याच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी त्याच्या सोबत जाऊन खातरजमा केली. मात्र तो नशेत असल्याने पोलिसांनी केवळ तक्रार दाखल करून घेतो असे सांगितले. याचा राग आल्याने सरफराज याने तुम्ही त्यांना आत्ताच अटक करा, मी त्यांच्या पेटवतो असे म्हणून त्याच्या पत्नीच्या हातातून पेट्रोलची बाटली ओतून घेऊन पोलीस ठाण्यातच स्वतः ला पेटवून घेतले होते. पोलिसांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलिसांच्या हाताला इजा झाली. सरफराज हा गंभीर भाजल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तो ७० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.