प्रतिनिधी / कोल्हापूर
पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा वाढता तणाव ही पोलीस दलासमोरील आव्हानात्मक समस्या आहे.कर्मचाऱ्यांवर तणाव असणार आहे,पण त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हा तणाव कमी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी हक्काच्या रजा,प्रवासी रजा मिळाल्या पाहिजेत.कुटुंबियासमवेत त्यांनी सुटी घालवली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असे पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी दै.तरुण भारत कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी तरुण भारतच्या कार्यालयास भेट दिली.यावेळी त्यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव यावर चर्चा केली.समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी चोवीस तास दक्ष असतो.रोजचे मोर्चे, आंदोलने,वाहतूकीचे नियोजन,राजकीय व्यक्तींसह व्हीआयपींचे दौरे अशा कामात त्यांना रात्रंदिवस रस्त्यावर थांबावे लागते.सर्व लोक सण-उत्सव साजरा करत असतात त्यावेळी पोलीस त्यांच्या सुरक्षेसेसाठी तैनात असतो.
मात्र त्यांचे स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड तणाव आहे. या तणावाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. पोलीसांचे स्वास्थ्य चांगले असेल तर समाजाचे स्वास्थ्य चांगले राहणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या तणाव व्यवस्थापनावर लक्ष देणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी हक्काच्या रजा मिळाल्या पाहिजेत.त्याशिवाय त्यांनी काही दिवसातून कुटुंबबियासमवेत वेळ घालवण्याची गरज आहे.कुटुंबासमवेत त्यांनी सहलही केली पाहिजे.ज्यामुळे रोजच्या कामाच्या तणावातून मुक्ती मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे डॉ.बलकवडे यांनी सांगितले.
यावेळी तरुण भारतचे निवसी संपादक मनोज साळुंखे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.बलकवडे यांचे स्वागत केले.वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशीद,वरिष्ठ उपसंपादक यशवंत लांडगे उपस्थित होते.
वाहतूकीचे नियोजन करणार
शहरात वाहतूकीची समस्या आहे.पार्किंगसाठी मोठÎा जागा नाहीत.यामळे वाहतूकीची कोंडी होते.वाहतूकीचे नियोजन व पार्किंग स्पेससाठी महापालिका पोलीस प्रशासनाला तर पोलीस महापालिकेला सहकार्य करतील असे पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त निधी आणणार
कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. पोलीस दलाला जुनी पार्श्वभूमी आहे. अनेक पोलीस ठाणे जुन्या इमारतीत आहेत. पोलीस ठाण्यांचे स्वरुप बदलून ते अत्याधुनिक होण्याची गरज आहे. पोलीसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आहे.पायाभूत सुविधाची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा पोलीस दलासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे.
बिनाधास्त लावा फोन
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपले कर्तव्य करत असतो. एखाद्या किरकोळ कामासाठी कोणीही उठतो आणि एस.पी.ना फोन लावू का अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्यांना देतो. असे कोणी म्हणत असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगावे बिनधास्त लावा फोन असा दिलासा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी कर्मचाऱ्यांना दिला.