प्रतिनिधी/ सातारा
कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत रामचंद्र साबळे (रा. वडुथ ता. सातारा) यांना पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्यासाठी दुसऱयांदा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. भारतामध्ये गुणवत्ता असलेल्या निवडक फक्त 25 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना पदक जाहीर झाले असून यावर्षी दुसऱयांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे महाराष्ट्रातील वसंत साबळे हे एकमेव पोलीस अधिकारी आहेत.
वसंत साबळे हे 1984 साली पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी 36 वर्ष अखंडित खंडाळा, फलटण, कराड, सातारा येथे सेवा केली आहे. सध्या ते कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंतच्या सेवा कालावधीत त्यांनी फलटण येथील गुंड कानिफ घोलप यांच्यावरील खुनी हल्ला, कराड येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण व खून प्रकरण, बोगस पत्रकार झपाटे-पाटोळे प्रकरण, पै. संजय पाटील यांच्यावरील गोळीबार खून प्रकरण, वाई येथील गाजलेला खून खटला, मांढरदेव दुर्घटना चौकशी, सातारा व कोरेगाव येथील महत्वाचे गाजलेले गुन्हे, सोनगाव येथे शेतात जप्त केलेली लाखो रुपयांची गांज्याची शेती, लाखो-कोटी रुपयांची अपहार प्रकरणे, अवैध पिस्टल रिव्हॉल्व्हर जप्त, कोरेगाव तालुक्यातील पळशी येथील अफरातफरीचे गुन्हे, दरोडे, चोरी अशा शेकडो गंभीर, क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुह्याचा तपास तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना न्यायालयात केसकामी लागणारी माहिती पुरवण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या केसेसमध्ये अनेक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्याबद्दल त्यांना आतापर्यंत 550 पेक्षा जादा रिवॉर्ड, सन्मानपत्र मिळालेली आहेत. बक्षिसांची रक्कम लाखापेक्षा जादा आहे. यापुर्वी त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक, दोन जादा वेतनवाढी, गुन्हे तपासाच्या कौशल्यासाठी तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गौरवले.
त्याचबरोबर साबळे यांनी आतापर्यंत कब्बडी, व्हॉलीबॉल, स्विमिंग, रनिंगमध्येही भाग घेतला असून स्पर्धांचेही नियोजन करत असतात. त्यांनी 21 किलोमीटर मॅरेथॉन तसेच व्हॉलीबॉल, सिंधुदूर्ग सागरी जलतरण स्पर्धेत, तसेच गोंदिया, अमरावती व तेलंगणा येथे झालेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत अनेक बक्षिस, ट्रॉफी, मेडल मिळवलेली आहेत. तसेच गोव्यापासून मुंबईपर्यंतच्या मॅरेथॉन स्पर्धेत अनेक बक्षिस पटकावलेली आहेत.
साबळे यांना दुसऱयांदा राष्ट्रपतीपदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, सुहास गरुड, पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, बी.आर. पाटील, संभाजी पाटील, बाजीराव भोसले, महादेव गावडे, राजेंद्र मोहिते, रंगराव कामिरे, राजीव मुठाणे, नानासो पन्हाळकर, रविंद्र पिसाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी, मॅरेथॉन, जलतरण पट्टू व वडूथ ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









