वडगाव शिवारातील प्रकाराची सर्वत्र चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे एकत्रित येण्यास बंदी आहे. परंतु काही अतिउत्साही तरुणांकडून या काळातही पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येत आहे. अशीच एक पार्टी वडगाव शिवारात सुरू असताना पोलीस आल्याने खवय्यांना मटण व भांडी टाकून पोबारा करण्याची वेळ आली. त्यामुळे वडगाव परिसरात याच घटनेची चर्चा रंगली होती.
मटणाचा दर गगनाला भिडला असल्यामुळे उपनगरांमध्ये काही जण एकत्र येऊन वाटे घालून मटण घेत आहेत. असाच वाटे घालण्याचा बेत आखून वडगावमधील काही युवक शिवारामध्ये बकरी घेऊन गेले. त्याचे वाटेही घालण्यात आले. त्यानंतर शिल्लक राहिलेले मटण तेथे शिजविण्यास सुरुवात करण्यात आली. तोवर शिवारातून जाणाऱया मार्गावरून पोलीस आल्याने सर्वांची भंबेरी उडाली. सर्व साहित्य तेथेच टाकून सर्व खवय्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे ते सैरावैरा पळू लागले. अखेर ते पोलिसांना सापडू न शकल्याने त्या खवय्यांनी सुटका झाली, परंतु घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच चांगली अद्दल घडली.









