प्रतिनिधी / गारगोटी
गारगोटी गडहिंग्लज रोडवर घुगरे मोटर गॅरेज समोर पोलीस असल्याची बतावणी करून एका निवृत्त वृद्ध शिक्षकाचे सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागीने चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलीसांच्या नावाचा वापर करून चोरट्यान थेट पोलीसांनाच अहवान दिल असुन या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
आज गारगोटीचा आठवडा बाजार होता. त्यातच इंजुबाई मंदिराजवळ पोलीसांनी आज नाकाबंदी केली होती. गारगोटीतील सावंत कॉलनीतील निवृत्त वृद्ध शिक्षक पी. एल. कांबळे दुपारी 12 वा सुमारास बाजार करुन पायी घरी चालले होते. ते गारगोटी गडहिंग्लज रोडवरून जात असतांना घुगरे मोटर गॅरेजनजीक पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांना अडवून आपण पोलीस असल्याचे सांगीतले. पोलीसांची नाकाबंदी असुन तुमची तपसणी झाली नाही का ? असा सवाल करून हात रूमालची अज्ञाताने मागणी केली. त्या शिक्षकांनी हात रुमाल काढून त्याच्याकडे दिला असता हात रूमालमध्ये अंगठी टाका असे सांगीतले तसेच गळ्यात चेन असल्यास काढण्यास सांगीतले. यावेळी खिशातील पैशाची चिल्लरही शिक्षकाने टाकली. त्यानंतर चोरटयाने रूमालची गाठ मारून रुमाल बाजाराच्या पिशवीत टाकल्याचे दर्शविले. घरात गेल्यानंतर बाजाराच्या पिशवीमधील सोन्याची पाहणी केली असता चेन व अंगठी आढळून आली नाही. फसलो गेल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व आपली फिर्याद दाखल केली.
पोलीसाने सोने लंपास केल्याचे चुकीच्या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ माजली. पोलीस खातेही चांगलेच हबकुन गेले. सायंकाळच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. घटना सकाळी घडूनही पोलीसाकडून माहिती देण्यास विलंब केला जात होता.
पोलीसांचा धाक कमी झाल्याची चर्चा गारगोटीत सुरु होती. पोलीस निरिक्षक संजय पतंगे यांची चांगलीच जरब होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर गुन्हेगारांनी डोके वरती काढले असुन पोलीस निरिक्षकासह, वरिष्ठांचाही धाक राहिलेला नाही. संजय पतंगे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा महिला वर्गात सुरु होती.









