तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीची सुनावणी येत्या 14 जानेवारी रोजी मुंबई येथील राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणासमोर होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधीक्षक सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या सुनावणीला हजर राहण्यासाठी आपणास राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.
सातपुते या सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्याविरुध्द कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करुन, त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी केला होता. याप्रकरणी चोरगे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे पोलीस अधीक्षक सातपुते यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीची सुनावणी 14 जानेवारी रोजी सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्यासमोर होणार आहे. त्यासाठी तक्रारदार चोरगे यांना त्यादिवशी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









