फलटण / प्रतिनिधी-
सराफाला लुटणाऱया दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱयांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील वडले गावात घडली आहे. दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. यावेळी एका दरोडेखोरास ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत. पण या घटनेमुळे सातारा जिह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत व आत्ता वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना वडले (ता. फलटण) येथे रविवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ लांडे हे सहकाऱयांसह जबरी चोरीच्या गुह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले होते. या जबरी चोरीतील आरोपी संशयित माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण तालुक्यातील सर्वच भागाची चांगलीच माहिती त्यांना आहे.
आरोपींचा शोध वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक घेत होते. यावेळी प्रविण प्रल्हाद राऊत (रा.चिखली) या दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आले. मात्र पप्पु उर्फ सुहास सोनवलकर (रा. वडले ता. फलटण) व प्रमोद ऊर्फ आप्पा ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर) हे दोघे दरोडेखोर पोलिसांच्या दिशेने गोळीबार करुन उसाच्या शेतातून पसार झाले आहेत. यामध्ये सर्व पोलीस पथक सुखरुप असून कोणालाही इजा झालेली नाही. फरारी आरोपीचा शोध पुणे ग्रामीण व फलटण पोलीस करीत आहेत.
या दरोडेखोरांनी फलटण-शिंगणापूर रस्त्यावर फलटणपासून 9 किलोमीटर अंतरावरील आहे. 26 ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सोने चांदी व्यावसायिकाची दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांच्याकडील 11 लाख 66 हजारांचे दागिने अज्ञातानी जबरीने चोरुन पसार झाले होते.
याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती. 25 ऑक्टोबरला दसऱयाच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणाऱया कुलथे यांना उद्घाटनाच्या दुसऱयाच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे.
दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाराची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल निवृती भुजबळ (रा. वाल्हे ता. पुरंदर जि. पुणे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.








