प्रतिनिधी / कोल्हापूर
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिवाजीराव सावंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस वसाहतीत `मृत्यूंजय’ कादंबरी लिहिली, याचा मला अभिमान आहे. ही कादंबरी ध्येयपुर्तीची मानसिक तयारी करण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे जरी ही वसाहत नवीन स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार यांच्या स्मृती पोलिस प्रशासन जपेल, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
`मृत्यूंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती दिनानिमित्त लक्ष्मीपुरी पोलिस वसाहत येथील आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. निर्धार प्रतिष्ठान आणि अक्षर दालन यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस अधिक्षक बलकवडे म्हणाले, सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती लोप पावत आहे. परंतू पालकांनी आपल्या पाल्याला पुस्तक वाचनाची सवय लावली पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या मुलांनाही पालकांनी मराठी पुस्तक वाचण्याची सवय लावली पाहिजे. कारण नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती रूजली पाहिजे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शिवाजीराव सावंत यांच्याबरोबर काही वेळ घालवण्याची संधी मला मिळाली. कोल्हापूर ही साहित्याची पंढरी आहे. एखाद्या पुस्तकाची निर्मिती करण्याना किती त्रास होतो, हे मी जवळून पाहिले आहे.
सावंत यांच्या स्मृती जपण्यासाठीचा निर्धारचा उपक्रम अतिशय अनुकरणीय आहे. समीर देशपांडे म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळाच्या 50 लाखांच्या निधीतून आजरा येथे शिवाजीराव सावंत यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मीपुरी पोलिस वसाहतीत सावंत यांच्या स्मृती जपण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र जोशी, प्राचार्य जॉन डिसोझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी राम देशपांडे, कृष्णा दिवटे, युवराज कदम, डॉ. कविता गगराणी, अमेय जोशी, सुरेश मिरजकर, नारायण बेहेरे, वासिम सरकवास, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.