खेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ खेड
लाकडाने भरलेला ट्रक सोडून देण्यासाठी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना 5 हजार रुपयांपैकी 3 हजाराची लाच देण्याचे आमिष दाखवणारा निजाम हुसेन पटाईत (50,गोवळकोट-चिपळूण) बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्य़ात अडकला. ही कारवाई येथील तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.
यातील तक्रारदार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम हे लोटे पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत आहेत. निजाम हुसेन पटाईत हा लाकूड व्यावसायिक असून त्याचा लाकूड वाहतुकीचा कारवाई केलेला ट्रक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱयांनी लोटे पोलीस दूरक्षेत्रात उभा केला होता. या अनुषंगाने प्रस्ताव वनविभागाकडे न पाठवता सोडून देण्यासाठी तक्रारदाराने सतत लाच देण्याचे आमिष दाखवले.
या बाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. यातील 3 हजाराची लाच देताना त्यास रंगेहाथ पकडले. ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार संदीप ओगले, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर, पोलीस शिपाई अनिकेत मोहिते यांनी ही कारवाई केली.
सरकारी कार्यालयामधील लाचेच्या मागणीसंदर्भात किंवा लाचेच्या आमिषासंदर्भात काही तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 02352-222893 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केले आहे.









