रत्नागिरी उद्यमनगर येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाताचे चावे घेऊन सराईत आरोपीने पलायन केल्याची घटना रत्नागिरी-उद्यमनगर येथे भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या लिस्टवर असलेल्या हेमंत पांडुरंग देसाई या सराईत संशयिताला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले आले होते. यावेळी त्याने पोलिसांवरच उलट हल्ला केला. पोलिसांनी त्याच्यावर झडप घालताच दोघा पोलीस कर्मचाऱयांच्या हाताला करकचून चावा घेत तो फरार झाला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 11.30 वा. घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पाडुरंग देसाई (29) हा मुंबई कांदिवली येथील राहणारा आहे. त्याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर विविध पोलीस स्थानकांतही गुन्हे दाखल आहेत. एका गुह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने जिह्यात गुन्हे केल्याच्या शक्यतेने तो पोलिसांच्या रडारवर होता. शुक्रवारी सकाळी तो उद्यमनगर येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. पोलीस कर्मचारी प्रवीण खांबे, दत्तात्रय कांबळे यांना ही माहिती मिळताच दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी उद्यमनगर परिसरात त्याच्या मागावर गेले होते.
या कारवाईत हेमंत पोलिसांच्या नजरेसमोर आला होता. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच हेमंतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असताना प्रवीण खांबे, दत्तात्रय कांबळे यांनी पाठलाग करून त्याच्यावर झडप टाकली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने जोरदार झटापट केली. दोन्ही कर्मचाऱयांच्या हाताला चावा चावा घेत त्यांना जखमी करून तो पसार झाला आहे. पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या हेमंतचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून न आल्याने त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर, ग्रामीण पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. पोलीस कर्मचाऱयांवर हल्ला करून फरार झालेल्या हेमंत देसाईविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









