मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रतिनिधी / मुंबई
संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.
चेंबूर येथील माहुल गाव परिसरातून सोहेल ऊर्फ उस्मान शमसुद्दीन शेख (27) व तय्यब मन्सुर शेख (41) यांना ताब्यात घेतले होते. बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणारे बांग्लादेशी असल्याच्या संशयावरून या दोघांना आरसीएफ पोलिसांनी मंगळवारी ठाण्यात आणले. नंतर सोहेलला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तेथून तो लल्लूभाई कंपाउंड परिसरातील राहत्या घरी आला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्यामुळे सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी सोहेलचा मृत्यू झाला. त्याला उच्च दाबाचा त्रास होता. पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपी कुटुंबीयांनी केला आहे.








