गोवा-महाराष्ट्र जोडणाऱया वाटा खंदक मारुन पूर्णपणे बंद
वार्ताहर / दोडामार्ग:
कुंब्रल येथे दोन दिवसापूर्वी चोरटी दारू वाहतूक करताना तेथील युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सीमाबंद असताना तालुक्यातून गोवा बनावटीची दारुची वाहतूक नेमकी झालीच कशी? हा प्रश्न पुढे आल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी यात लक्ष घालत चोरवाटा शोधल्या व उपनिरीक्षक सुनील बागल यांनी या चोरवाटा मंगळवारी पूर्णपणे बंद केल्या.
दोडामार्ग तालुका व गोवा राज्याची सीमा जोडली गेल्याने अनेक महत्वाच्या सीमा सुरक्षेच्यादृष्टीने बंद केलेल्या आहेत. महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या बॅरिकेट्स लावून सीमा बंद करून कडक पहारा देत आहेत. पण, काही अंतर्गत चोरवाटा अवैध धंदे करणाऱयांनी शोधून काढत याच मार्गाने अवैध मालाची वाहतूक होत आहे. हीच संधी व त्या वाटा शोधत दोन दिवसापूर्वी कुंब्रल येथे अवैध दारू वाहतूक करणारी वाहन पकडले गेले. सीमाबंदी असूनही वाहने गेलीच कशी? या प्रश्नांने पोलिसांना दोषास पात्र केले. या घटनेने खडबडून जागे होत चोरवाटांचा शोध घेत मंगळवारी सासोली-इब्रामपूर-गोवा व सासोली येथील कालव्यावरील रस्त्यामार्गे गोव्यात ये-जा करता येणारा मार्ग जेसीबीच्या साहाय्याने चर मारुन पूर्णपणे बंद केल्या. त्यामुळे आता चोरटय़ा मार्गाच्या वाहतुकीला प्रतिबंध बसणार आहे की नाही, हे पुढचा काळच ठरविणार आहे.









