रामदुर्ग येथे मलप्रभा नदीत बुडून दोघा जुगाऱयांचा अंत : पोलिसांकडून तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव/रामदुर्ग
पोलिसांचा पाठलाग चुकविताना मलप्रभा नदीत उडी टाकलेल्या रामदुर्ग येथील दोघा जुगाऱयांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून सोमवारी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. रामदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
समीर महंमदसाब बटकुर्की (वय 22) राहणार रामदुर्ग, मंजुनाथ लक्ष्मण बंडीवड्डर (वय 28) रा. किल्ला तोरगल अशी त्यांची नावे आहेत. अग्निशमन दलाचे जवान, मच्छीमार, पाणबुडे व एसडीआरएफ पथकाच्या प्रयत्नाने सोमवारी सायंकाळी दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार रामदुर्गजवळील पडकोट क्रॉसनजीकच्या हिंदू स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी मोठय़ा प्रमाणात अंदरबाहर जुगार रंगला होता. याची माहिती मिळताच सायंकाळी सहाच्या सुमारास रामदुर्ग पोलिसांनी या जुगारी अड्डय़ावर छापा टाकला. जुगाऱयांनी थोडय़ा अंतरावर दोघा जणांना उभे करून जर पोलीस आले तर आम्हाला इशारा देण्यात यावा, असे सांगितले होते.
पोलिसांना पाहताच जुगाऱयांना इशारा मिळाला. त्यामुळे 30 ते 35 जण पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्यापैकी 6 जणांनी जवळच असलेल्या मलप्रभा नदीपात्रात उडय़ा टाकल्या. चौघे जण पोहत पलीकडे गेले तर दोघे जण अर्ध्यावरच नदीत बुडाले. पोहून पाण्याबाहेर आलेल्या चौघा जणांनी पोलिसांना यासंबंधीची माहिती देताच रविवारी रात्रीपासूनच पाण्यात बुडालेल्या दोघा जणांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली.
घटनेची माहिती समजताच डीसीआरबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी रामदुर्गला भेट देऊन पाहणी केली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल, पाणबुडे, मच्छीमार व एसडीआरएफला पाचारण करण्यात आले. सोमवारी दिवसभर त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता आपण बेंगळुरात आहोत. रामदुर्ग येथे जुगारी अड्डय़ावरील छाप्यानंतर पलायन करताना मलप्रभेत बुडून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी जुगारी पळून गेल्यामुळे जुगाऱयांसंदर्भात एफआयआर दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.र्ं
फक्त बुडाल्याची फिर्याद
रामदुर्ग पोलिसांशी संपर्क साधला असता या प्रकरणाची नोंद झाली आहे. मात्र, जुगारी अड्डय़ाचा कुठेच उल्लेख आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नदीपात्र ओलांडताना दोघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. प्रत्यक्षात रविवारी सायंकाळपासूनच रामदुर्ग तसेच संपूर्ण जिल्हय़ात या घटनेची जोरदार चर्चा होती.









