ऑनलाईन टीम / मुंबई :
देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर गर्दी करत गावाला जाण्यासाठी परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली.
लॉकडाऊनमुळे परराज्यातील हजारो मजूर मुंबईत अडकून पडले आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारच्या मजुरांची संख्या जास्त आहे. हजारोंच्या संख्येने जमलेल्या या जमावाने गावी जाण्यासाठीलांब पल्याची गाडी सोडण्याची मागणी केली.
अंदाजे दीड तास या मजुरांचे वांद्रे स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू होते.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागविण्यात आला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम आवाहन केले. त्यानंतर सौम्य लाठीमार केला. राज्य सरकार तुमची सर्व व्यवस्था करणार आहे. त्यामुळे तुम्ही आहे तिथेच सुरक्षित रहा असे सांगत पोलिसांनी मजुरांची समजूत काढली. त्यानंतर स्टेशनबाहेरील गर्दी हळूहळू ओसरली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मजुरांना आवाहन
“तुम्हाला घरी जायचं आहे, हे मी समजू शकतो. पण तूर्तास मुंबई सोडू नका. तुम्ही सध्या आहात तिथेच थांबा, तेच सर्वांच्या हिताचे आहे. सर्वांना निवारा आणि अन्न सरकारकडून पुरविण्यात येईल. त्यामुळे कायदा व्यवस्था कोणीही मोडू नका,” असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.









