लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध : जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट : नागरिकात संभ्रम
प्रतिनिधी / बेळगाव
खडेबाजार पोलिसांनी अचानक लॉकडाऊनचा आदेश आला म्हणून खडेबाजार परिसरातील हॉटेल्स, दुकाने आणि बाजारपेठ बंद करण्यास भाग पाडले. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे खळबळ उडली. यावेळी दुकानदार आणि इतर व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. रात्रीच्यावेळी कर्फ्यूचा आदेश होता. मात्र दुपारी दीडच्या सुमारास अचानकपणे ही कारवाई झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत खडेबाजार पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊनचा आदेश आला आहे असे सांगितले. याबाबत प्रांताधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र लॉकडाऊनचा आदेश नाही असे सांगितले.
लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध – जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांच्याशी संपर्क साधला असता लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मॉल, किराणा दुकाने, हॉटेल्स याठिकाणी उभे राहून खरेदी करता येणार नाही. तर ते पार्सलच्या पद्धतीने घेतले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पोलिसांनी अचानकपणे ही कारवाई केली आहे असे विचारले असता लॉकडाऊन म्हणजे घरी सर्व गोष्टी पार्सल करणे असे सांगत संभ्रमच निर्माण केला आहे. एकूणच लॉकडाऊन की निर्बंध हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.









