जागते रहो ते क्यु आर कोड ऍप
सुधाकर काशीद/कोल्हापूर
`जागते रहो’ असे म्हणत पूर्वी पोलिसांना रस्त्यावर काठी आपटत गस्त घालायला लागायची. पोलीस त्यांना नेमून दिलेल्या भागात पहाटेपर्यंत फिरायचे. अर्थात त्यावेळी शहर लहान होते. त्यानंतर पोलीस गस्तीसाठी सायकलवरून फिरू लागले. त्या काळात हंबर कंपनीची हिरवट रंगाची, हँडलला पुढे डायनामा असलेली सायकल पोलिसांकडे गस्तीसाठी हमखास असायची. त्यानंतर जाळीची गाडी आणि त्यात बोलणे कमी आणि खरखर जास्त असलेला वायरलेस सेट असायचा. गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी एखादा दवाखाना, मंदिर, एसटी स्टँड, एखाद्या मोठÎा बंगल्याचे आवार येथे हजेरी वही ठेवलेली असायची व त्यात गस्तीवरच्या पोलिसाने गस्तीच्या वेळीच सही करायची पद्धत होती. या पद्धतीत अनेक त्रुटी होत्या. प्रामाणिक पोलीस जरूर गस्त घालायचे. पण काही चतुर पोलीस मात्र बरोबर यातूनच पळवाट काढायचे.
आता या पळवाटेला संधी मिळणार नाही अशी नवी क्यू आर कोड पद्धत पोलिसात अवलंबली जात आहे. विशेषतः कोल्हापुरात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही त्याची दखल घेत कौतुक केले आहे. `बेस्ट युनिट इन यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पोलिसिंग’ अशा शब्दात प्रशस्तीपत्रही दिले आहे. या गोष्टीमुळे चोऱया कमी होतील का नाही, हा पुढचा भाग आहे. पण पोलिसांना ठरलेल्या मार्गावर रास्ता रात्री गस्त घालावीच लागणार आहे. कारण त्याच्या नोंदी क्षणात नियंत्रण कक्षाला कळणार आहेत.
पोलिसांच्या नित्य कामकाजात रात्रपाळीच्या गस्तीला खूप महत्त्व असते. गस्तीसाठी एक पोलीस निरीक्षक असतो. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे फौजदार, पोलीस नेमणुकीस असतात. त्यांना गस्तीची हद्द ठरवून दिलेली असते. पूर्वी हातातली काठी रस्त्यावर आपटत व `जागते रहो’ अशी थोडÎा थोडÎा अंतरावर हाळी देत गस्त घालण्याची पद्धत होती. पुढे पुढे पद्धती बदलत गेल्या पण त्यात काही त्रुटी राहिल्या गेल्या. काही पोलिसांकडून या त्रुटी पळवाट म्हणून वापरल्या जायच्या. काही वेळी ठराविक ठिकाणी ठेवलेल्या वहीत त्याच वेळी सही करण्या ऐवजी दुसऱया दिवशी केल्या जाऊ लागल्या. रात्री एकाच ठिकाणी बसायचे. व वायरलेसवर मात्र आम्ही अमुक ठिकाणी आहे तमुक ठिकाणी आहे अशी कळवायचे अशीही काही जणांनी `सोय’ करून घेतली होती.
आता मात्र क्यू आर कोडमुळे चुकारपणा करता येणे अशक्य आहे. त्यासाठी पोलिसांना एक ऍप दिले असून त्याआधारे गस्तीच्या मार्गावरील क्यू आर कोडच्या ठिकाणी त्यांना आपले अस्तित्व दाखवण्यासाठी जावेच लागणार आहे. त्यावरून गस्तीवरचा पोलीस ठराविक वेळी त्या ठिकाणी गेला की नाही कळू शकणार आहे.
कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी व काही तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे हे तंत्र विकसित केले आहे. त्याचा कोल्हापूर जिह्यात वापर व्यवस्थित आहे. अन्य काही जिह्यात प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर आहे. मात्र राज्य पोलीस महासंचालकांनी कोल्हापुरातील रात्र गस्तीच्या या क्यूआर कोडची चांगली दखल घेऊन पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
चौकट
कोल्हापुरात रात्रीची गस्त आधुनिक होत आहे. मात्र रात्रीची गस्त हा पोलिसांच्या कामातील एक वेगळ्या अनुभवाचा भाग आहे. रात्री सारा गाव, सारे शहर झोपेच्या अधीन असताना पोलीस मात्र थंडी, वारा, पाऊस याला सामोरे जात गस्त घालत असतात. त्या काळात रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावरही माणसाच्या जगण्याचे वेगवेगळे पैलू अनुभवत असतात. पोलीस खात्यात येणाऱया बऱया-वाईट प्रसंगांना तोंड कसे द्यायचे, याचे अनुभव अनेक पोलीस रात्र गस्तीतच शिकतात.









