वृत्तसंस्था/ वॉरक्लॉ
येथे झालेल्या युरो चषक 2020 सराव सामन्यात रशियाला 1-1 असे बरोबरीत रोखण्यासाठी पोलंडला संघर्ष करावा लागला. याकुब स्वीएरकॉकने पोलंडचा गोल नोंदवल्यानंतर व्याचेस्लाव्ह काराव्हाएव्हने रशियाला बरोबरी साधून देणारा गोल नोंदवला. पोलंडचे प्रशिक्षक पॉलो सौसा यांनी स्टार्टिंग इलेव्हनमधून अनेक नियमित खेळाडूंना बाहेर ठेवले होते. त्यात टॉप स्कोअरर रॉबर्ट लेवान्डोवस्कीचाही समावेश होता. तरीही त्यांच्या संघाने फ्लाईंग स्टार्ट देताना याकुबने चौथ्याच मिनिटाला पोलंडला आघाडी मिळवून दिली. याकुबचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल होता. रशियाने नंतर 20 व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. राईटबॅक काराव्हाएव्हने अलेक्झांडर गोलोविनकडून मिळालेल्या क्रॉस पासवर गोलरक्षक लुकास फॅबियान्स्कीला हुलकावणी देत हा गोल नोंदवला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी अनेकदा गोलपोस्टपर्यंत मजल मारली. पण सदोष नेमबाजीमुळे त्यांना मिळालेल्या संधींचा लाभ घेता आला नाही. उत्तरार्धात दोन्ही संघांनी अनेक बदल केले. पण त्याला फारसे यश मिळाले नाही. रशिया युरो स्पर्धेत डेन्मार्क, फिनलंड, बेल्जियम यांच्यासह गट ब मध्ये असून गट ई मध्ये पोलंड, स्पेन, स्वीडन, स्लोव्हाकिया यांचा समावेश आहे.









