अजित पैंगीणकर/ काणकोण
गोवा मुक्तीलढय़ाच्या कालखंडात आझाद गोमंतक दल आणि अन्य सत्याग्रहींना अत्यंत क्रूर अशी वागणूक देणाऱया आणि मोर बाबूश म्हणून संपूर्ण काणकोण महालात परिचित असलेल्या अँग्लो-इंडियन पोर्तुगीज नागरिकाचा मुलगा डॅनियल मोर बाबूश याचे नुकतेच आगोंद येथे निधन झाले. मागच्या जवळजवळ 15 वर्षांपासून डॅनियल याचे या ठिकाणी वास्तव्य होते. सध्या त्याचे पार्थिव पणजीच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.
मोर बाबूश हा मुक्तीपूर्व काळात काणकोण महालाचा रेजिदोर त्याचप्रमाणे पोर्तुगीजांचा हस्तक होता. सत्याग्रही, भूमिगत कार्यकर्ते आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांचा गुप्त अहवाल पोर्तुगीज अधिकाऱयांना पोहोचविण्याचे काम तो करत होता. नेमबाजी आणि शिकारीत पटाईत असलेली सदर व्यक्ती उडणाऱया पक्ष्याची देखील शिकार करायची, असे डॅनियलने एका भेटीच्या वेळी सांगितले होते. काणकोणच्या भागशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज जी भव्य अशी इमारत आहे त्या ठिकाणी मोर बाबूश याचे निवासस्थान होते. पोर्तुगीज राजवटीत याच जागेच्या अर्ध्या भागात स्वातंत्र्यसैनिक दिनानाथ गावकर यांनी आपला भागीदारीवर व्यवसाय सुरू केला होता.
डॅनियल आणि त्याची सर्व भांवडे याच जागी लहानाची मोठी झाली. आज ज्या भागात रवींद्र भवन उभारले जात आहे तो भाग त्या काळात दाट झाडीचा होता. या भागात आपल्या वडिलांनी कित्येक वेळा रानटी श्वापदांची शिकार केली होती. तळय़ांनी भरलेल्या या ठिकाणी कासवे, मासे पकडण्याचा आपला छंद होता, अशी माहिती डॅनियलने दिली होती. मुक्तीपूर्व काळातील अनेक गोष्टी व आपल्या अनेक मित्रांच्या आठवणी तो सांगायचा.
मोर बाबूशची दहशत
क्रूरकर्मा आजेंत मोन्तेरोइतकाच काणकोणच्या नागरिकांचा अनन्वित असा छळ मोर बाबूश याने केला. त्याने सर्वत्र दहशत निर्माण केली होती. काणकोण आणि कर्नाटकातील माजाळी, सैलवाडा, वांगड परिसर यांच्यात पूर्वीपासून सलोख्याचे संबंध असून माजाळी येथे आझाद गोमंतक दलाचा तळ होता. मुक्तीलढय़ातील सत्याग्रहींचे या भागात येणे-जाणे चालू असायचे. माजाळी परिसर 1947 साली स्वतंत्र झाला होता. पोळे चेकनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागात जायचे झाल्यास पासपोर्ट करावा लागायचा. अशा वेळी आपल्या नातेवाईकांकडे जायचे झाल्यास पोर्तुगीजांचा हस्तक असलेला मोर बाबूश काणकोणच्या नागरिकांचे हाल करायचा आणि त्यांना एक-एक दिवस चेकनाक्यावर बसवून ठेवायचा, अशी माहिती त्या काळातील हयात असलेल्या काणकोणच्या नागरिकांनी दिली. त्याचबरोबर मोर बाबूशविषयी चांगल्या गोष्टी सांगणाऱया काही व्यक्ती या ठिकाणी अजूनही आहेत.
डॅनियलने केला होता मुलांचा छळ
आज ज्या इमारतीमध्ये काणकोणचे भागशिक्षणाधिकारी कार्यालय चालू आहे त्या ठिकाणी पूर्वी पोर्तुगीज शिक्षणाची शाळा चालू होती. त्याला आवल असे म्हणायचे. स्थानिक मुले पोर्तुगीज शिकायला या शाळेत यायची. डॉ. शाबा गावकर यांनी या शाळेत शिक्षण घेतले होते, अशी माहिती शांताजी गावकर यांनी दिली. 1955 ते 1959 या काळात गोवा मुक्तीची चळवळ तेजीत आली होती. या शाळेत शिकायला येणाऱया अनेक स्थानिक मुलांचा शारिरीक छळ डॅनियलने केला होता. विचारणारा कोणीच नव्हता. त्याच्या भयाने कित्येकांनी शाळा देखील सोडली होती, अशी माहिती मिळाली.
मुक्तीच्या दोन दिवस आधी पलायन
मोर बाबूशच्या कृत्यांनी आझाद गोमंतक दल वैतागले होते. त्याच्या शोधार्थ ते असताना त्याचा एक मुलगा या दलाच्या हाती सापडला आणि त्याचा सूडबुद्धीने गावडोंगरी येथील जंगलात खात्मा करण्यात आला, असा दावा डॅनियलने अनौपचारिकरीत्या बोलताना केला होता. भारताचे लष्कर गोव्यात येणार याची चाहूल लागताच गोवा मुक्तीच्या दोन दिवस अगोदर मोर बाबूश याने आपल्या कुटुंबासहित पोर्तुगालला पलायन केले. पुढे त्यांचे काय झाले हा जरी इतिहास असला, तरी आपली खोतीगाव, गावडोंगरी या भागांमध्ये खूप मोठी जमीन असून ती जमीन शोधण्यासाठी आपण गोव्यात आलो होतो, असे तो सांगायचा. डॅनियलचे वास्तव्य सध्या दुमाणे, आगोंद येथील स्व. धाकू कोमरपंत यांच्या जागेत होते. त्याचे काही नातेवाईक पणजी, म्हापसा येथे राहत असून त्यांच्याशी तो वारंवार गप्पा मारायचा. पोर्तुगाल सरकारचे पेन्शन त्याला मिळत होते. पोर्तुगालला त्याचा एक भाऊ राहतो. आपले काही जवळचे नातेवाईक हे जग सोडून गेल्यामुळे आपण आता एकाकी पडल्याची जाणीव त्याला सतावत होती, अशी माहिती काणकोणचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, प्रमोद गावकर, गौरीश कोमरपंत यांनी दिली.
काणकोणात अंत्यसंस्कारांची इच्छा
आपली आणि डॅनियलची भेट ही मागच्या 15 वर्षांतील आहे. पोर्तुगीज राजवटीत त्याच्या हातातून काही अक्षम्य घडल्यास त्याची आपल्याला विशेष कल्पना नाही. मात्र त्याला काही गोष्टींचा पश्चाताप होत आहे याची जाणीव व्हायची, असे मत राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केले. याच जाणीवेतून केवळ माणुसकीच्या भावनेतून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार काणकोणात व्हावेत अशी त्याच्या काही मित्रांची इच्छा आहे. त्याचा जन्म काणकोणातच झाला होता. त्याच्या निधनानंतर त्याचे पार्थिव सध्या पणजीच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. त्याचे पणजी, म्हापसा येथे असलेले नातेवाईक, पोर्तुगालला असलेला त्याचा भाऊ या सर्वांना याची कल्पना देण्यात आलेली आहे. त्याच्या जवळचा पासपोर्ट पोर्तुगीज असल्यामुळे त्याच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारांसाठी दुतावासाच्या परवानगीची आवश्यकता आहे. तसा दाखला मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. डॅनियलच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारांसंबंधी चावडी चर्चच्या फादरशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती गौरीश कोमरपंत व धनंजय यांनी दिली. आपला जन्म या भूमीत झाला होता आणि अंत्यसंस्कार देखील याच भूमीत व्हावेत अशी त्याची इच्छा होती, अशी माहिती कोमरपंत यांनी दिली.








