प्रतिनिधी/ पणजी
पोर्तुगिज काळात संपूर्ण तिसवाडी तालुक्यला पाणीपुरवठा करणाऱया चिंबल येथील तळीचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे आश्वासन साबाखामंत्री दीपक पाऊसकर यांनी दिले आहे. काल या तळीची पाहणी आमदार टोनी रॉड्रीग्स स्थानिक सरपंच व पंच यांच्या उपस्थितीत मंत्री पाऊसकर यांनी केली.
साबाखांच्या तांत्रिक टीमसह मंत्र्यांनी या तळीची पाहणी केली. या तळीचे पाणी घरगुती वापरासाठी व शेतीसाठी कसे वापरणे शक्य आहे याचा विचार करून तळीचे काम केले जाणार आहे. कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण करून नोव्हेंबर 2020 पर्यंत या तळीचे काम हाती घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्री पाऊसकर यांनी दिले.
चिंबल येथील डोंगराळ भागातील तळीचे महत्त्व तिसवाडी तालुक्याच्या दृष्टीने बरेच मोठे आहे. पोर्तुगिज काळात या तळीचे पाणी संपूर्ण तिसवाडी तालुक्यासाठी वापरले जायचे. पोर्तुगिज काळात या तळीच्या पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जायचा. आजही या तळीचा वापर चांगल्या पद्धतीने केला जाणे शक्य आहे. तळी विकसीत केल्यास घरगुती वापरासह शेतीसाठीही या पाण्याचा वापर करणे शक्य आहे. यावेळी स्थानिक आमदार टोनी रॉड्रिग्स यांनीही या तळीच्या पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर पोर्तुगिज काळात या तळीच्या पाण्याचा वापर कशापद्धतीने व्हायचा याबाबतच्या आठवणीनाही यावेळी उजाळा देण्यात आला. लवकरांत लवकर या तळीचे काम हाती घेण्यात यावे व पाण्याचा वापर या परीसरातील लोकांना करता यावा असा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला.









