वृत्तसंस्था/ वाशिंग्टन
पोर्तुगाल संघाने कतारमध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यात यश मिळविले असून क्रिस्टियानो रोनाल्डोला विश्वचषक मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.
मंगळवारी झालेल्या युरोपियन प्लेऑफ लढतीत पोर्तुगालने नॉर्थ मॅसेडोनियाचा 2-0 गोलफरकाने पराभव केला. रोनाल्डोला आता पाचव्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मंगळवारी वर्ल्ड कपसाठी एकूण सात स्थाने निश्चित व्हावयाची होती. 21 नोव्हेंबरपासून कतारमध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. मंगळवारपर्यंत एकूण 27 संघांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली असून बुधवारी उशिरा आणखी दोन संघ निश्चित होणार आहेत. शुक्रवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात येणार असून आठ मानांकित संघ निश्चित झाले आहेत, त्यात यजमान कतार, अर्जेन्टिना, बेल्जियम, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन यांचा समावेश आहे. दुसऱया पॉटमध्ये क्रोएशिया, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, उरुग्वे आणि बुधवारी पात्रता मिळविल्यास मेक्सिको व अमेरिका यांचा समावेश असेल.
नॉर्थ मॅसेडोनियाने गेल्या आठवडय़ात इटलीला पराभवाचा धक्का देत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे पोर्तुगाललाही असाच धक्का देत ते पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण पोर्तुगालने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आणि सलग सहाव्यांदा आणि एकूण आठव्यांदा वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली.









