वृत्तसंस्था/ पॅरिस
2022 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या पात्र फेरीच्या सामन्यात पोर्तुगालला सर्बियाने बरोबरीत रोखले. दुसऱया एका सामन्यात हॉलंडने लॅटिव्हियाचा 2-0 असा पराभव केला. लक्झमबर्गने आयर्लंडला पराभवाचा धक्का दिला. बेल्जियम आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील सामना गोल बरोबरीत राहिला.
शनिवारी बेलग्रेड येथे झालेल्या सामन्यात रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला सर्बियाने 2-2 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात दुखापतीच्या कालावधीत पोर्तुगालतर्फे नोंदविलेला निर्णायक गोल पंचांनी नाकारल्याने कर्णधार रोनाल्डोने या निर्णयाविरुद्ध मैदानात संताप व्यक्त केल्याने काही वेळ मैदानात अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडले. या सामन्यात पूर्वार्धात पोर्तुगालतर्फे जोटाने दोन गोल नोंदविले होते. त्यानंतर सर्बियाने उत्तरार्धात दोन गोल नोंदवून पोर्तुगालशी बरोबरी साधली. या सामन्यातील तिसऱयाच मिनिटाला रोनाल्डोने नोंदविलेला गोल पंचांनी नियमबाहय़ ठरविला होता.
अन्य एका सामन्यात हॉलंडने लॅटिव्हियाचा क गटातील सामन्यात 2-0 असा पराभव केला. या गटातील यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात तुर्कीकडून पराभव पत्करावा लागला होता. बेल्जियम आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. झेक प्रजासत्ताकतर्फे लुकासने तर बेल्जियमतर्फे लुकाकूने गोल केला. अ गटातील झालेल्या सामन्यात लक्झमबर्गने आयर्लंडवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. डब्लीनमधील झालेल्या या सामन्यात लक्झमबर्गतर्फे एकमेव गोल 85 व्या मिनिटाला रॉड्रिग्जने केला. ‘च’ गटातील सामन्यात रशियाने स्लोव्हेनियाचा 2-1 असा पराभव करून या गटातील गुणतक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे. क्रोएशियाने सायप्रसवर 1-0 अशी मात केली.









