पंतप्रधानांनी घेतली भेट – हवामान बदलासह गरिबी निर्मूलनावर चर्चा
व्हॅटिकन सिटी / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-20 परिषदेच्या निमित्ताने सध्या विदेश दौऱयावर आहेत. इटालियन पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या निमंत्रणानंतर त्यांनी हा दौरा केला. याचदरम्यान शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी आजच्या भेटीनंतर पोप फ्रान्सिस यांना भारत दौऱयासाठी निमंत्रित केले. ही बैठक अवघ्या 20 मिनिटांसाठी नियोजित होती. पण प्रत्यक्षात तासभर चाललेल्या बैठकीत हवामान बदल, गरिबी निर्मूलन आणि कोरोना संसर्ग आदी मुद्दय़ांवर विस्तृतपणे चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
पोप फ्रान्सिस यांच्यासोबत खूपच चांगली चर्चा झाली. मला या भेटीत अनेक विषयांवर बोलण्याची संधी मिळाली. भेटीनंतर मी पोप यांना भारत भेटीला बोलावले असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पर्यावरणीय बदल आणि दारिद्रय़ निर्मूलन यासारख्या अनेक विषयावर या भेटीत चर्चा झाली. या भेटीदरम्यान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाची आठवणही त्यांनी बोलून दाखवली असल्याचे कळते. 1999 मध्ये पोप जॉन पॉल-2 यांनी भारत दौरा केला होता.
पोप यांच्या भेटीसाठी कोणताच अजेंडा ठरलेला नव्हता. एखाद्या पवित्र विषयावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोणताही अजेंडा नसतो. या गोष्टीचा आम्ही मान राखला. जागतिक पातळीवर तसेच भारतासाठी काय महत्त्वाचे आहे, यासारख्या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी दिली आहे. या भेटीवेळी मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हेसुद्धा सहभागी झाले आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे ग्लास्को येथे बैठकीसाठी रवाना झाले. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदींना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
पोप यांची भेट घेणारे मोदी पाचवे भारतीय पंतप्रधान
ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांना भेटणारे पंतप्रधान मोदी हे पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी पोप यांची भेट घेतली आहे. 1999 मध्ये वाजपेयींनी पोप जॉन पॉल-2 यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता 21 वर्षानंतर पीएम मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. त्यांनी मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारल्यास पोप यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पोप जॉन पॉल-2 यांनी 1999 मध्ये भारताला भेट दिली होती.
इटलीच्या पंतप्रधानांसह भारतीय लोकांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इटली दौऱयात शुक्रवारी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेतली. तसेच विविध समाजांशी, भारतीय लोकांशी तसेच भारताचे मित्र असलेल्या संस्थांशी गाठीभेटी घेतल्या. यादरम्यान लोकांशी संवाद साधताना एका व्यक्तीने त्यांना मराठीतून हाक मारली. त्यांनी आपले नाव माही गुरूजी म्हणून सांगितले असून आपण गेली 22 वर्षे इटलीत असल्याचे त्यांनी मोदींना सांगितले. त्यानंतर मोदीही त्यांच्याशी मराठीतूनच बोलले. तसेच काही लोकांशी मोदींनी गुजराती भाषेतून संवाद साधत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.









