प्रतिनिधी/ बेंगळूर
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दोनवेळा लांबणीवर पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहेत. लवकरच आपण नवी दिल्लीला जाऊन हायकमांडशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असल्याचे येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमकूर जिल्हय़ातील सिरा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्यापूर्वी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. पोटनिवडणूक प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी संपणार असून त्यानंतर आपण नवी दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे. वरिष्ठांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मागील महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मात्र, पोटनिवडणुकीमुळे तो लांबणीवर पडला आहे. पण नेमके केव्हा दिल्ली दौऱयावर जाणार, हे अद्याप निश्चित केलेले नाही. पोटनिवडणुकीनंतरच दिल्ली दौऱयावर जावे लागेल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी केली असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ते शक्य झालेले नाही. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी येडियुराप्पा सप्टेंबर महिन्यात दिल्लीला गेले होते. मात्र, अधिवेशनामुळे हायकमांडने तुर्तास मंत्रिमंडळ विस्तार नको, असे येडियुराप्पांना स्पष्टपणे बजावले होते. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर लगेच राजराजेश्वरीनगर आणि सिरा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता.
आता भाजप सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्यांपैकी एमटीबी नागराज आणि आर. शंकर यांना मंत्रिपदे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या मंत्रिमंडळातील 6 जागा रिक्त आहेत. त्यापैकी चार जागा भरती करून उर्वरित दोन जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय येडियुराप्पा यांनी घेतला आहे. एखाद्या वेळेस भाजप हायकमांडने मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्याची सूचना केली तर चार-पाच मंत्र्यांना डच्चू देऊन सात ते आठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होणार
शुक्रवार आणि शनिवारी सिरा-राजराजेश्वरीनगर मतदारसंघात प्रचार करणार आहे. त्याचबरोबर दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा मोठा विजय होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. पोटनिवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाचे काही नेते भाजपवर टीका करीत आहेत. मात्र, अजूनपर्यंत आपण एकदाही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस आणि निजदच्या पदरी निराशा येणार असून भाजप उमेदवार मोठय़ा मतांच्या फरकाने विजयी होणार आहेत, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले.