आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने विजापूर जिल्हय़ातील सिंदगी व हावेरी जिल्हय़ातील हानगल विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी मतदान व 2 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. निजदचे एम. सी. मनगुळी यांच्या निधनाने सिंदगी मतदारसंघात तर भाजपचे सी. एम. उदासी यांच्या निधनाने हानगल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत.
या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार व निजदचे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी आदी नेत्यांसाठी प्रति÷sच्या ठरल्या आहेत. हानगल तर मुख्यमंत्र्यांच्या हावेरी जिल्हय़ातील मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात विजय मिळविणे त्यांना अनिवार्य आहे.
सिंदगी विधानसभा मतदारसंघ निजदच्या ताब्यात होता. आता तो मिळविण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. हानगल नाही तर किमान सिंदगी तरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी निजद नेत्यांनी धडपड सुरू केली आहे. हानगलमध्ये सी. एम. उदासी तब्बल सहावेळा निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव शिवकुमार उदासी सध्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याच कुटुंबातील रेवती उदासी यांना उमेदवारी मिळण्याची शक्मयता आहे. सिंदगीवर विजय मिळविण्यासाठी कोणाला उमेदवारी द्यायची, यासाठी सर्वच राजकीय पक्षांत ऊहापोह सुरू आहे. एम. सी. मनगुळी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी द्यायची की कुटुंबाबाहेरील उमेदवार निवडायचा, याचा विचार निजद नेते करीत आहेत. भाजपतर्फे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना सिंदगीतून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा होती. आपण किंवा आपले पुत्र सिंदगीतून निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून लक्ष्मण सवदी यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
विधानसभा निवडणुकीला अद्याप 18 महिन्यांचा अवधी आहे. आतापासूनच तीनही राजकीय पक्षांच्या कवायती सुरू झाल्या आहेत. निजद नेत्यांनी यंदा ‘मिशन 123’ साठी आतापासूनच शिबिरे भरवून नेते, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भाजपने तर किमान 150 जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प केला आहे. भाजप-निजदचे संकल्प काहीही असोत, आपले उद्दिष्ट ‘मिशन 224’ असल्याचे सांगत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या कवायतीत काँग्रेसही मागे नाही, हेच दाखवून दिले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत 2023 च्या निवडणुकीत सत्ता मिळवायचीच आहे. कारण, आजवर ‘ऑपरेशन कमळ’ राबवूनच भाजप सत्तेवर येऊ शकला. कर्नाटकात मतदारांनी त्यांना पूर्ण बहुमत दिलेले नाही. किमान आगामी निवडणुकीत तरी कोणाचीही कुबडी न घेता सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ मिळविण्याची जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. यातच बी. एस. येडियुराप्पा हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर कर्नाटक भाजपमध्ये पुन्हा अंतर्गत कलह डोके वर काढू लागला आहे.
सिंदगी व हानगल पोटनिवडणुकीत सामुदायिक नेतृत्व असणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर आगामी निवडणुका बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली होतील, असे जाहीर केल्यानंतर भाजपमधील अनेक ज्ये÷ नेते सावध झाले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुका होणार, अशी अटकळ आहे. कारण भाजपला बेंगळूर महानगरपालिका निवडणुका जिंकायच्या आहेत. यापाठोपाठ येणाऱया जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीतही उत्कृष्ट कामगिरी करायची आहे. या तीन निवडणुका पार पडल्या की विधानसभेची तयारी सुरू होणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच सिंदगी, हानगल पोटनिवडणुकीला महत्त्व आले आहे. भाजपमधील नेतृत्वाचा घोळ सुरूच आहे. माजी आमदार व तुमकूर जिल्हा भाजपाध्यक्ष सुरेश गौडा यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी दिलेले कारण लक्षात घेता भाजपमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी सुप्तावस्थेत असल्याचे जाणवते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाबद्दल कोणाचीच हरकत नाही. ते चांगले नेते आहेत. ज्यांनी दक्षिणेत भाजपची सत्ता आणली. त्यासाठी आपले उभे आयुष्य वेचले, त्या येडियुराप्पा यांना व त्यांच्या समर्थकांना पक्षात कशी वागणूक मिळते आहे, हे आम्ही पाहात आहोत. सेनापतीच नसेल तर युद्ध कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करीत सुरेश गौडा यांनी राजीनामा दिला आहे. याचाच अर्थ येडियुराप्पा आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात चांगली वागणूक मिळत नाही, असा काढला जात आहे. आता पक्षानेही शंभर मतदारसंघात नवे चेहरे शोधण्याचे काम आतापासूनच सुरू केले आहे. प्रतिमा डागाळलेल्या नेत्यांना उमेदवारी न देता स्वच्छ चारित्र्य असणाऱयांची निवड करून त्यांना उमेदवारी देण्यासंबंधी चाचपणी सुरू आहे. पक्षाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. कलंकितांना दूर ठेवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. लसीकरणाचा वेगही वाढला आहे. रोज 500 ते 550 नवे रुग्ण आढळून येत आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 12 हजारावर आली आहे. त्यामुळे कर्नाटकात सर्व व्यवहार पूर्ववत करण्यावर सरकारने भर दिला आहे. अनेक मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. दसरा तोंडावर आला आहे. 7 ऑक्टोबरला ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवाची सुरुवात होणार आहे. यंदा साधेपणाने दसरा साजरा केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले आहे. ऐतिहासिक जम्बो सवारी 15 ऑक्टोबर होणार आहे, मात्र हा कार्यक्रम राजवाडय़ापुरताच मर्यादित राहणार आहे. कोरोनाने यंदाचेही दसरा वैभव झाकोळले आहे.