बेळगाव लोकसभा, मस्की-बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेंगळूर
सिरा आणि राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर जागे झालेले काँग्रेस नेते आगामी मस्की, बसवकल्याण विधानसभा मतदारसंघ आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी नवी रणनीती आखणार आहेत. सत्ताधारी भाजपवर गैरकारभाराबाबत आरोप करत असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच नव्या रणनीतीद्वारे पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गत विधानसभा निवडणुकीत मस्की आणि बसवकल्याण मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला होता. बसवकल्याण मतदारसंघाचे आमदार नारायणराव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मस्की मतदारसंघाचे काँग्रेस आमदार प्रतापगौडा यांनी काँग्रेला सोडचिठ्ठी देऊन भाजपप्रवेश केला आहे. याचबरोबर बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या तिन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली आहे. सध्या मस्की आणि बसवकल्याण मतदारसंघात काँग्रेसकडे अद्याप प्रभावी उमेदवार नाही. मस्की मतदारसंघातून गत निवडणुकीत पराभवाला सामारे गेलेले भाजप उमेदवार बसनगौडा तुरुवेहाळ सोमवारी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत. त्यामुळे त्यांनाच काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
बसवकल्याण आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे आतापासूनच सदर मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचा पुढाकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी घेतला आहे. त्यानुसार शिवकुमार रविवारपासून तीन दिवस उत्तर कर्नाटक दौऱयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्येही शिवकुमार प्रामुख्याने मस्की आणि बसवकल्याण मतदारसंघाला भेट देणार असून स्थानिक नेत्यालाच पोटनिवडणुकीची जबाबदारी देणार आहेत.
सिरा आणि राजराजेश्वरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बाहेरील नेत्याकडे पोटनिवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. आगामी पोटनिवडणुकीत स्थानिक नेत्याकडे जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे बुथ पातळीवरील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पक्षात सक्रिय होतील. त्यानुसार नव्या रणनीतीद्वारे भाजपचा पराभव करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे.









