वारणानगर / प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलाच्या सेवेतून पोखले ता. पन्हाळा या आपल्या गावी सुट्टीवर आलेला जवान सागर शिवाजी निकम (वय. ३४) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने उपचारा दरम्यान निधन झाले. ऐन सणासुदीत सागर यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तर सागर यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली.
जवान सागर निकम हे १ सप्टेंबर रोजी एक महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले होते. काल गुरुवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बांबवडे ता. शाहूवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अखेर त्यांची प्राणजोत मालवली.
त्यांच्यावर पोखले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पवार, गोपनीय विभागाचे कृष्णाथ पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी, सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली.
सैन्य दलाच्या तोफखाना विभागात होते कार्यरत
सागर निकम हे सन २००६ पासून भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना विभागात कार्यरत होते. सद्या ते अलवर राजस्थान येथे कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई वडील, आजोबा असा परिवार आहे









