प्रतिनिधी / नागठाणे :
दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला बोरगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.. या टोळीतील दोघांनी अतीत (ता.सातारा) येथे अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या टोळीने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे. टोळीतील सचिनकुमार योगेंदर साह व रंजित गेंदालाल साह यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून अतीत येथून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे. उर्वरित इतर संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्रगस्त घालत असताना बोरगाव पोलिसांना अतीत येथील एसटी बसस्थानकाजवळ ८ इसम संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांची तपासणी केली.यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगेत दागिने पॉलिश करण्यासाठी वापण्यात येणारी पावडर, ब्रश असे साहित्य आढळून आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या टोळक्याची अधिक चौकशी केली. यावेळी टोळीतील सचिकुमार साह व रंजित साह यांनी अतीत येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ नुसार कारवाई करण्यात आली.आरोपींकडून अतीत येथील गुन्ह्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन सोन्याची कर्णफुले व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. सचिनकुमार साह व रंजित साह हे सध्या बोरगाव पोलीसांच्या कोठडीत असून उर्वरित संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.