प्रतिनिधी / सावंतवाडी:
राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका तसेच बारावीनंतरच्या औषध निर्माणशास्त्र, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट अंतिम मुदत होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक कागदपत्रे तसेच विविध दाखले मिळवण्यासाठी उशिर होत आहे. त्यामुळे राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.
याकरिता संचालनालयाने ही प्रक्रिया 4 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परिपत्रकानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी 7 सप्टेंबरला जाहीर होणार असून त्याबाबतचे आक्षेप 10 सप्टेंबरपर्यंत नोंदविता येतील. त्यानंतर 12 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
शैक्षणिक संस्थांच्या कोटय़ातील राखीव जागांसाठी अर्ज भरणे ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंत ही प्रक्रिया कट ऑफ डेटपर्यंत सुरू राहणार आहे. 4 सप्टेंबरनंतर पडताळणी होऊन सदर अर्ज संस्थास्तरावरील तसेच प्रवेश प्रक्रियेत रिक्त जागांसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.









