बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिल्यास राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजाराच्या खाली आल्यास लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात येईल असे म्हंटले आहे.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर यांनी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात सोमवारी विधान केले असून राज्य एकदम अनलॉक करता येणार नसून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवला जाणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या अपेक्षेएवढी नाही. राज्यात अजून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत घट होणे आवश्यक आहे. त्यामुळे तज्ञांशी बोलून, सर्व मंत्र्यांची मते जाणून घेऊन मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढवायचा की उठवायचा याविषयी निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी राज्याला सोमवारी कोव्हॅक्सिनच्या १ लाख ६४ हजार लसीचा पुरवठा झाला असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकार राज्याला योग्य ते सहकार्य करत आहे. दरम्यान, ४५ वर्षावरील ३ लाख लोकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल असेही ते म्हणाले.









