●बाधितांचा आकडा 24 तासात 1 हजार 04 वर ●लिंब, ठेसेघरात कोरोना टेस्ट केल्याशिवाय लस नाही असा फतवा ●कोरोना टेस्टींग शिबिराला गैरहजर राहणाऱ्या गावच्या पदाधिकाऱ्यांना निघणार नोटीस
प्रतिनिधी / सातारा :
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढत असून, मागील 24 तासातला पॉझिटिव्हीटी रेट 9.75 टक्के आहे. शुक्रवारपेक्षा शनिवारी एका दिवसात 1.49 टक्क्यांनी पॉझिटीव्हीटी रेट वाढला आहे. त्यामुळे बाधितांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढली असून, शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत 1004 रुग्ण आढळून आले. लिंब, ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्रावर जो लस घ्यायला येईल, त्यास पहिली आरटीपीसीआर टेस्ट केली तरच लस मिळेल असा फतवा काढण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी उशीरा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सगळीकडे नियम पाळून व्यवहार सुरु झालेले आहेत. मात्र, दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेवून पुन्हा कोरोना बोकाळु नये, याचीच भिती प्रशासनाला वाटू लागली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट टप्याटप्याने वाढतच चालला आहे. त्यातच दि. 24 रोजी पॉझिटीव्हीटी रेट हा 7.02 इतका होता तर दि.25 रोजी हा 8.26 होता. यामध्ये 1.06 इतका रेट वाढला. तर दि.26 रोजी 9.75 रेट आला आहे. त्यामुळे अनलॉकचा गैरफायदा घेवून नियम न पाळल्याचा तोटा म्हणून पुन्हा लॉकडाऊन येण्याची भिती प्रशासनाला लागून राहिली आहे. रुग्णवाढीने 13 दिवसांनी पुन्हा हजारांचा आकडा ओलांडला. त्यामुळे पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. शुक्रवारी 10296 जणांचे स्वॕब तपासणी केले होते. त्यापैकी 1004 जण पॉझिटीव्ह आढळून आले.
लिंब, ठोसेघरमध्ये आरटीपीसीआर टेस्टशिवाय लस नाही
लिंब आणि ठेसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे अँटीजन, आरटीपीसीआर चाचणीबाबत कामकाज समाधानकारक नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र लिंब येथील वैद्यकीय अधिकारी व मंडलाधिकारी यांना पूर्वी सुचना देऊनही प्रगती दिसून येत नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांस पत्र देवून सुचित केले. तसेच ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता त्या ठिकाणी डॉक्टर व नर्स यांच्याशिवाय कोणीही दिसून येत नाही. कॅम्पचे नियोजन केले तर तेथे टेस्टला कोणीही येत नाही. वैद्यकीय टीमने ठोसेघर, कास रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंध लसीकरण दिले जाते त्या ठिकाणी अँटीजन व आरटीपीसीआर टेस्टचे शिबिर घ्यावे, अशा सुचना सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिल्या होत्या.
आरटीपीसीआर टेस्ट केल्याशिवाय लस मिळणार नाही, असे सांगण्यात आले नव्हते. तरीही लसीकरण केंद्रामध्ये लस घ्यायला येणाऱ्यांना अगोदर टेस्ट करा, रिपोर्ट आल्यानंतरच मग लस घ्या, असा फतवा काढण्यात आला आहे. तसेच गावोगावी जे कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन केले जाते, तेथे जे सतत फिरत असतात. त्यांची टेस्ट केले जात नाही, तसेच जे कॅम्पला ग्रामपंचायत सदस्य फिरकत नाहीत. अशा ग्रामपंचायत सदस्यांना नोटीसा काढण्यात येणार असल्याचे समजते.
शनिवारपर्यंत नमुने….10,42,714, बाधित…..1,90,587, मुक्त…..1,77,194, मृत्यू…..4303, उपचारार्थ…..9961









