अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 18 जून 2021, सकाळी 10.25
● लॉकडाऊनमधील शिथिलता वाढणार का? ● जिल्हावासियांना उत्सुकता ● गेल्या 24 तासात 716 नवे बाधित ● चार दिवसानंतर रूग्णवाढ ओसरली ● मृत्यू संख्याही कमी होतेय
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या निकट सहवासितांच्या चाचण्यांंचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने आज (शुक्रवारी) जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्हावासियांसह व्यापारी, व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सध्या ठराविक व्यावसायिकांना अटी व शर्थींसह सकाळी ते दुपारी 2 पर्यंत परवानगी दिली आहे. त्यामधे आणखी काही शिथिलता येईल का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 716 नवे रूग्ण बाधित झाले आहेत. या आठवड्यात सोमवारी आणि शुक्रवारी रूग्णवाढ ओसरल्याचे दिसते.
आठवड्यातील कोरोना परिस्थितीवरून निर्णय
गेल्या आठवडाभरात सोमवार आणि आज शुक्रवारचा अपवाद वगळता रूग्णवाढ 820 ते 972 च्या दरम्यान वाढली आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. दररोजची वाढणारी रूग्णवाढ आणखी कमी करण्यासाठी प्रशासन काम करत आहे. आज शुक्रवारी आठवडाभराच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. जिल्ह्यात दुपारी दोन नंतर अजुनही कडक लॉकडाऊन आहे. शिवाय बरेच व्यवसाय आजही बंदच आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.
कराड, सातारा तालुक्यात वाढ कायम
जिल्ह्यात कराड व सातारा तालुक्यात रूग्णवाढीचा आकडा अजुनही तीन अंकावर आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता 175 ते 200 पर्यंत रोजच रूग्णवाढ होत आहे. त्या तुलनेत फलटण, खटाव, माण, कोरेगांव, वाईसह इतर तालुके दोन अंकी रूग्णवाढीवर आले आहेत. त्यामुळे कराड, सातारा तालुक्यातील आकडे कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
बाजारपेठांमधील गर्दी ठरतेय कारण
सातारा आणि कराड या दोन्ही बाजारपेठा मोठ्या असून दोन्ही तालुक्यातील गावांसह आसपासच्या जिल्ह्यातील लोकही खरेदीसह इतर कामांसाठी गर्दी करत आहेत. दररोज दुपारी 2 पर्यंत या काळात रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि दुकानांसमोरील गर्दी जमावबंदीच्या कलमाचे मिनिटाला भंग करत आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील रूग्णवाढीवर नियंत्रण आणताना प्रशासनही मेटाकुटीला आले असावे. अधिकृत सवलत असल्याने पोलिसांवरही कारवाईच्या मर्यादा आहेत. परिणामी इतर तालुक्यांच्या तुलनेत आकडे कमी होताना दिसत नाहीत
देशात 61 दिवसांनी मृत्यूदर सर्वात कमी पण…
महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. मात्र गुरूवारी देशात 62 हजार 374 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली तर तब्बल 61 दिवसानंतर मृत्यूचा आकडा 1590 एवढा कमी झाला. रूग्णवाढीच्या दीडपट म्हणजे 88 हजार 455 रूग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान राज्यात गुरूवारी 9 हजार 830 रूग्ण आढळले तर 5 हजार 890 रूग्णांनी कोरोनावर मात केली. 636 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी जिल्हय़ात एकूण बाधित 716, एकूण मुक्त 938एकूण बळी 27
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने – 949777 एकूण बाधित – 18 4371 घरी सोडलेले – 171514 मृत्यू -4147 उपचारार्थ रुग्ण-9102









