युनियन बँकेत पेन्शन काढण्यासाठी आलेल्या वृद्धेची फसवणूक
प्रतिनिधी / मिरज
शहरातील किल्ला भाग येथे युनियन बँकेच्या शाखेत पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेस एका भामट्याने पैसे मोजून देण्याचा बहाणा करून 14 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत प्रज्ञा अशोक कांबळे (वय 25, रा. सुभासनगर मनीषा कॉलनी) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
प्रज्ञा कांबळे आणि त्यांची आजी या दोघीजणी युनियन बँक मिरज शाखेत पेन्शन आणि पोस्टाचे पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी बँकेतून 49 हजार रुपयांची रक्कम काढली. बँकेतून मिळालेले पैसे त्या मोजत बसल्या असता, त्यांच्याजवळ एक अज्ञात इसम आला. त्याने बँकेतून मिळालेल्या काही नोटा फाटक्या आणि खराब असतात. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित मोजून देतो, असे म्हणून सदर वृद्धेकडील पैशांचा बंडल मागून घेतला व पैसे मोजण्याचा बहाणा करून शिताफीने त्यातील 14 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. उर्वरित पैसे सदर वृद्धेकडे देऊन तो पसार झाला. सदर वृद्धेची नात प्रज्ञा हिने पुन्हा पैशांची मोजणी केली असता, 49 हजार रुपयांच्या बंडल मधून 14 हजार रुपयांची रक्कम कमी झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर भामट्याने पैसे मोजून देण्याचा बहाणा करून 14 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार त्यांनी मिरज शहर पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.