कारवाईपासून वाचण्यासाठी पोलीस अधिकाऱयाची शक्कल
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी अधिकाऱयांच्या भ्रष्टाचाराचे नवनवीन किस्से अधूनमधून चर्चेला येत असतात. कोणत्या अधिकाऱयाची पद्धत कशी आहे? याचीही चर्चा होते. सर्वसामान्य नागरिक पैसे देत नाहीत म्हणून त्यांची कामे अडविली जातात. याला चाप लावण्यासाठीच लोकायुक्तसारख्या भ्रष्टाचारविरोधी संस्था कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या डोळय़ात धूळफेक करून पैसा गोळा करण्यासाठी अधिकारी नामी शक्कल लढवित असतात.
बेळगाव येथील एका पोलीस अधिकाऱयाने लोकायुक्त कारवाईच्या भीतीने लाच घेण्याची पद्धतच बदलली आहे. यासाठी त्याने जाकिटचा पर्याय शोधून काढला आहे. तालुक्मयाची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱया पोलीस स्थानकातील एक अधिकारी सध्या बढतीच्या उंबरठय़ावर आहे. पुढील वषी तो सेवानिवृत्त होणार आहे. म्हणून लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या तावडीत सापडलो तर आपली अवस्था ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी होईल, या भीतीने त्याने लाच स्वीकारण्यासाठी नवीनच फंडा शोधला आहे.
हे महाशय डय़ुटीवर येताना आपल्या अंगावर जाकिट घालून येतात. कार्यालयात आल्यानंतर जाकिट खुंटीला अडकवतात. दिवसभर वेगवेगळय़ा प्रकरणात मांडवली केल्याबद्दल ते मलिद्याची मागणी करतात. समोरच्या पार्टीने खिशात हात घालताच ते त्यांना सावध करतात. आणि आपण टांगलेल्या जाकिटकडे बोट करतात. त्यानंतर ती पार्टी त्यांना द्यायची लाच गुपचूपपणे त्या जाकिटच्या खिशात घालते. त्यानंतर ते अधिकारी आपली डय़ुटी संपल्यानंतर जणू काही घडलेच नाही अशा थाटात आपले जाकिट अंगावर चढवून निघून जातात. गेल्या काही दिवसांपासून या जादुई जाकिटची चर्चा रंगली आहे. अनेकांना खोटय़ा गुन्हय़ात अडकविणाऱया या अधिकाऱयाला कोणी तरी आपल्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार करून कारवाई करतील, अशी भीती आहे. त्यामुळेच त्याने जाकिटचा पर्याय शोधल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून आपल्या केबिनच्या दरवाजाला त्याने आतून कडीही बसवून घेतली आहे जी या अगोदर नव्हती. एकूणच भ्रष्टाचार करण्याची ही नामी शक्कल पाहून अनेकजण अवाक् होत आहेत.
रंगेहाथचा फॉर्म्युला…
जेव्हा एखादा सामान्य नागरिक भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेकडे आपली तक्रार घेऊन येतो. त्यावेळी लोकायुक्त अधिकारी लाचखोरांना जाळय़ात अडकविण्यासाठी नोटांना एक विशिष्ट प्रकारची पावडर लावून देतात. यावेळी ती पावडर रंगहीन असते. मात्र लाचखोर अधिकाऱयाने या नोटांना हात लावताच त्याच्या हाताला ही पावडर लागते. आणि त्यानंतर जेव्हा लोकायुक्त अधिकारी छापा टाकतात, त्यावेळी त्या अधिकाऱयाच्या हातावर पाणी घालताच भ्रष्टाचाऱयाचे हात गुलाबी रंगाचे बनतात आणि त्याने लाच स्वीकारल्याचे जाग्यावरच सिद्ध होते. म्हणून काही अधिकारी लाच स्वीकारण्यासाठी एजंटांची नियुक्ती करतात.









