खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / सांगली :
खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांची भेट घेऊन अनेक विषयांबाबत निवेदन देवून चर्चा केली.
उन्हाळी सुट्टीमधील शालेय पोषण आहाराचा भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बँकेत खाती उघडण्यात यावीत, असे संचालकांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. पहिली ते पाचवीसाठी 156 रुपये मिळणार आहेत व ते एकदाच मिळणार आहेत. 156 रुपयांसाठी पालकांनी एक दिवस मोलमजूरीचे खाडे करून तसेच विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यासाठी पैसे खर्च करून खाती उघडावी लागणार आहेत. झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास परवानगी दिली तरी सुद्धा पैसे जमा झाल्यानंतर काढताना खात्यावर कमीत कमी पाचशे रुपये ठेवावे लागतात. त्यामुळे शासनाने जमा केलेले 156 रुपये सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत. यासाठी शासनाने पैशांऐवजी धान्य स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
तसेच दोन लाख रुपयांच्या आतील वैद्यकीय बिले मनपा क्षेत्रातील खाजगी प्राथमिक शिक्षकांना 100% शासनामार्फत देण्यात यावीत अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ज्या शिक्षकांचे यापूर्वी एका वर्षात 21 दिवसांचे प्रशिक्षण झालेले आहे. त्यांना प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र द्यावे, त्याचबरोबर ज्या शिक्षकांचे अद्याप प्रशिक्षण झाले नाही, अशा शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण होण्यासाठी डाएटकडे मागणी करण्यात यावी. सेतू अभ्यासक्रमाबाबत सर्व शिक्षकांना माहिती व्हावी, यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी राज्य हिशोब तपासणीस मु. न. तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष डी.बी. कांबळे, हिशोब तपासणीस महेश सपकाळ, सहसचिव अरविंद चव्हाण, मुख्याध्यापक सेल प्रमुख रमेश शिंगाडे, मिरज तालुका व मनपा क्षेत्राध्यक्ष युवराज वायदंडे, सचिव बाबासाहेब माने, सदस्य हनुमंत बोंदर इत्यादी उपस्थित होते.








