प्रतिनिधी / बेळगाव
येथील गोमटेश विद्यापीठाच्या मागील बाजूस जैन मंदिरानजीक स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पेव्हर्स घालण्यात आले होते. मात्र, सध्या येथील परिस्थिती पाहता हेच स्मार्ट सिटीचे काम आहे का, असा प्रश्न पडतो आहे
येथील रस्ता खराब असल्याने या ठिकाणी पेव्हर्स घालण्यात आले आहेत. येथून ये-जा करणाऱया वाहनांमुळे येथील काही पेव्हर्स दबले गेले आहेत. रस्त्यावर घालण्यात आलेली चिपिंग खडीदेखील पेव्हर्सवर पसरलेली आहे.
त्यामुळे येथून ये-जा करणाऱया वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागतो आहे. हे पेव्हर्स खाली-वर झाल्याने या मार्गावरून जाताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीने केलेल्या या कामाबद्दल जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.