
अनेकदा आपल्या घरात वापरण्यात न येणाऱया अशा अनेक गोष्टी तशाच पडून असतात. याच गोष्टी घेऊन आपणास त्यांना नवीन साज देत काहीतरी वेगळी अन् उपयोगी अशी वस्तू बनविता येते. अशीच एक वस्तू म्हणजे बांगडय़ा. बांगडय़ा या सुवासिनींबरोबरच तरुणींनाही हमखास आवडतात. मग त्या किती खरेदी करतील याचा नेम नाही. मॅचिंग अशा बांगडय़ा खरेदी करण्यावर बायका भर देतात. अशा बांगडय़ा खरेदी केल्यावर आपल्याकडे बांगडय़ांचा ‘स्टोकच’ तयार झालेला असतो जणू. नवीन बांगडय़ा घेतल्या म्हटल्यावर जुन्या बांगडय़ा तशाच पडून राहतात. काहींची पॅशन गेलेली असते तर काहींमधील चमक फिकी पडत असते. हळदी-कुंकूला देखील वाण म्हणून वाटल्या जाणाऱया बांगडय़ा अनेकवेळेला आपल्या मापाच्याही नसतात. मग या बांगडय़ांचे काय करायचे हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. काहीदा आपल्याकडे असलेले एखादे ककंण किंवा बांगडी आपल्याला खूप भावते पण किंचितसे वजन वाढल्याने म्हणा किंवा कमी झाल्याने त्या होत नाही. अशावेळी ही बांगडी किंवा कंकण आपल्याला डोळय़ादेखत दिसावे असेही काहींना वाटत असते. तेव्हा त्यापासून विविध कलाकुसर करून आपण आपल्या आवडीची गोष्ट नेहमी पाहू शकतो. अशावेळी या बांगडय़ामधून आपण एक सुंदर असा ‘पेनस्टेड’ साकारू शकता. गोंद लावून एकावर एक अशा आपल्याला पाहिजे त्या रंगसंगतीनुसार, पाहिजे त्या नक्षीनुसार आपण या बांगडय़ा एकावर एक अशा मांडून छानसा ‘पेनस्टेड’ तयार करू शकता. हा ‘पेनस्टेड’ बनवत असताना आपण खालील बेसदेखील सुंदररित्या सजवून त्यावरही या बांगडय़ा रचू शकता. हा बेस आपण बांगडय़ांच्या रंगसंगतीनुसार सजवू शकता. त्याचाही रंग त्यानुसार ठरवू शकता. यावर पिस्ताचे कवच देखील रंगवून आपण चिकटवू शकता.









