लॉकडाऊनच्या काळात स्विमिंग पुलाचा कायापालट
समीर नाईक / पणजी
कोरोना काळात अनेक महिने बंद असलेला म्हापसा पेडे येथील स्विमिंग पूल क्रीडा खात्याच्या दिशानिर्देशानुसार फक्त राज्यस्तरीय खेळाडूंसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या स्विमिंगपटूंना राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करण्यासाठी आता पुरेपुर वेळ मिळणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होणार होत्या, यासाठी अनेक नवीन मैदाने व इनडोअर स्टेडियम बांधण्यात आले तसेच अनेक जुनी स्टेडियम व मैदानांची डागडूजी केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे क्रीडा क्षेत्राला देखील ब्रेक घ्यावा लागला. क्रीडा खात्यातर्फे कोरोना काळाचा चांगला उपयोग करुन म्हापसा पेडे, साखळी, फोंडा येथील स्विमिंगपूलांची डागडूजी करुन नव्या स्वरुपात खेळाडूंसाठी खुले करण्यात आले आहे.
म्हापसा पेडे येथे राज्यातील अनेक अव्वल दर्जाचे स्विमिंगपटू सराव करायला येतात. गेल्या काही महिन्यांमध्ये स्विमिंग पूल वापरात नसल्यामुळे तसेच येथे असलेल्या इमारतीच्या नूतनीकरणामुळे या स्विमिंग पुलाची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. परंतु अल्बर्ट दुरादो यांनी क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई व एई विशाल बिरोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात पुलाची दुरुस्ती करुन या पुलला पुर्वीपेक्षा अधिक सुस्थितीत आणले.
हल्लीच क्रीडा खात्याच्या दिशानिर्देशानुसार फक्त राज्यस्तरीय खेळाडूंसाठी स्विमिंग पूल खुले करण्यात आले असून राज्याचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू येथे सराव करत आहेत. त्यांनी देखील या पुलाच्या सुधारणाबाबत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी श्याम, पॉल व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कर्मचाऱयांनी या स्विमिंग पुलाच्या दुरुस्तीसाठी महत्वाचा वाटा उचलला आहे.
प्रतिक्रिया
स्विमिंग करण्यायोग्य पूल तयार : झेवियर डिसोझा
पेडे येथील स्विमिंग पुलामध्ये लॉकडाऊननंतर मोठा बदल झाला आहे. लॉकडाऊनच्या आधी या स्विमिंग पुलाची दुर्दशा झाली होती. येथे प्रत्येक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. तसेच डायव्हिंग खांब देखील धोकादायक झाले होते, त्यामुळे सराव करताना भीती वाटत होती. परंतु लॉकडाऊनमध्ये या पुलाची दुरुस्ती केल्याने आता स्विमिंग करण्यायोग्य असा हा स्विमिंग पूल आहे. पूल खुला झाल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करण्यासाठीही चांगली संधी आहे, असे मत राज्यस्तरीय स्विमिंगपटू झेवियर डिसोझा याने व्यक्त केले.
स्वच्छ पुलात स्विमिंग करताना आनंद : श्रुंगी बांदेकर
पेडे येथील स्विमिंग पुलामध्ये सुरुवातीच्या काळापासून सराव करत आले आहे. आधी या स्विमिंग पुलामध्ये सराव करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु लॉकडाऊननंतर पुलाचा कायापालट झाला असून स्वच्छही करण्यात आला आहे. त्यामुळे 7 महिन्यांनंतर परत सराव करताना आनंद होत आहे, असे राज्यस्तरीय स्विमिंगपटू श्रुंगी बांदेकर हिने सांगितले.
लॉकडाऊननंतर पूल सुस्थितीत : नीलेश बोर्डे, पालक
पणजी येथील स्विमिंग पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने आम्ही आमच्या मुलांना पणजीहून म्हापसा येथे सरावासाठी घेऊन येतो. एका काळी हा स्विमिंग पूल मुलांना सरावासाठी योग्य नव्हता. येथे अनेक समस्या होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये स्विमिंग पुल देखरेख अधिकारी अल्बर्ट दुरादो व त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करुन सदर पुल सुस्थितीत आणला. आता पणजीतील स्विमिंग पूल देखील लवकरच खुला करावा, असे नीलेश बोर्डे यांनी सांगितले.
प्रशिक्षकाची गरज : माधुरी, पालक
म्हापसा येथे अनेक राज्यस्तरीय स्विमिंगपटू सरावासाठी येतात, त्यामुळे सदर स्विमिंग पूल स्वच्छ व सुरक्षित असणे गरजेचे आहे. याआधी अनेकांना त्वचांच्या समस्या झाल्या होत्या. यानंतर क्रीडा खात्याने दखल घेत या स्विमिंग पुलामध्ये मोठा बदल केला असून आता स्विमिंगपटू सुरक्षित आहे. सध्या एका राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाची गरज असून याबाबत क्रीडा संचालक व्ही. एम प्रभुदेसाई यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांनी यात लक्ष घालून ही गरज पूर्ण करु असे आश्वासनही दिले असल्याचे माधुरी यांनी सांगितले.
स्विमिंगपटू आनंदी : सुनिल सिगणापूरकर
स्विमिंग पूल सरावासाठी खुला केल्याने मुले देखील आनंदी आहेत. स्वच्छ व पूर्ण सुरक्षित करुन हा पुल स्विमिंगपटूंसाठी खुला केल्याने त्यांना राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी तयारी करण्यासाठी सुवर्ण संधी लाभली आहे. याचा त्यांनी पूर्ण उपयोग केला पाहिजे. क्रीडा खात्याने हा स्विमिंग पूल खुला केल्याने त्यांचे सुनिल सिगणापूरकर यांनी आभार मानले.









