प्रतिनिधी /पेडणे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पेडण्यातील सुप्रसिद्ध पुनव रविवार 9 ऑक्टोबर रोजी साजरी होणार असून या उत्सवाची जय्यत तयारी सध्या पेडणे भगवती मंदिर परिसरात सुरू आहे.
विविध प्रकारचे स्टॉल, विविध प्रकारची दुकाने मंदिर परिसर ठिकाणी मांडण्यात आली आहेत. श्री भगवती मंदिरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई करून मंदिर सजवलेले आहे. कोटकरवाडा ते पेडणे बाजारपेठेत विद्युतरोषणाई घालून कमानी लावलेल्या आहेत. बाजारपेठेतही भगवे झेंडे लावून तसेच मंदिर परिसरात शुभेच्छा देणारे फलक विविध राजकीय पक्षांनी लावल्याने वातावरण तयार करत हा परिसर सजविलेला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पेडण्याचा सुप्रसिद्ध दसरा उत्सव व पूनव हा घटस्थापनेपासून सुरू झालेला आहे. या उत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला लागूनच साजरी होणारी पूनव यंदा रविवार 9 रोजी साजरी होणार आहे. यासाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच विविध आस्थापनाचे मालक आणि भाविक सज्ज झाले आहेत.
देव रवळनाथ व देव भूतनाथ यांची तरंगे ही कोटकरवाडा येथे भगवती मंदिर व तेथून आदिस्थान देवाचा मांगर येथे सध्या ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी सुहासिनी तसेच भाविक महिला मोठय़ा संख्येने जाऊन श्री देव रवळनाथ आणि श्री देव भूतनाथ देवाच्या तरंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहेत. श्री भगवती मंदिरातही मोठय़ा संख्येने सुहासिनी महिला देवीची ओटी भरण्यासाठी येत आहेत.









