विरोधी महाआघाडीचा धुव्वा, कार्यकर्त्यांचा जल्लोष व विजयी घोषणांनी पालिका चौक दणाणला
सणगर संतोष / पेठ वडगाव
शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक, कोरे, आवाडे, शेट्टी, यड्रावकर, मिणचेकर यांच्या राजर्षी शाहू पॅनेलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाल्या. सत्ताधारी गटाने वडगाव बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधी मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खास.धैर्यशील माने, आम.राजूबाबा आवळे यांच्या महाआघाडीचा धुव्वा उडविला. जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या निकालाने महाडीक गटाला उभारी मिळाली असून हातकणंगले मतदारसंघातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी म्हणूनही या निकालाकडे पहिले जात आहे.
पेठ वडगाव येथील मंगलधाम येथील सभागृहात सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी विजयी निकालानंतर सत्ताधारी शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वडगाव पालिका चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. माजी आ. महादेवराव महाडिक, आम.डॉ.विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी आम.अमल महाडीक व अन्य नेतेमंडळीनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून मतदारांचे आभार व्यक्त केले.
सत्ताधारी माजी आम.महादेवराव महाडीक,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मंत्री राजेंद्र यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, आम.डॉ.विनय कोरे, माजी आम.मिणचेकर- गटातून विजयी उमेदवार व पडलेली मते अशी – सर्वसाधारण गट- किरण जयसिंगराव इंगवले (९०६ विजयी), विलास बाबासो खानविलकर (८९४), आण्णासो बंडू डिग्रजे (८६५), जगोंडा लक्ष्मण पाटील (८८२), शिवाजी पांडुरंग पाटील (८७९), सुरेश तात्यासो पाटील (८८५), बाळकृष्ण गणपती बोराडे (८५६), महिला प्रतिनिधी गटातून- भारती रावसो चौगुले (८९४), वैशाली राजेंद्र नरंदेकर (८६२), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून- चाँद बाबालाल मुजावर (८८२), विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास पप्रवर्ग प्रतिनिधी गटातून- धुळगोंडा आण्णासो डावरे-(८६७), सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून -सुनिता मनोहर चव्हाण(४०२), राजू उर्फ अभयकुमार आप्पासो मगदूम-(४१०), अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गटातून- नितीन पांडुरंग कांबळे (४११), आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी गटातून- वसंतराव शामराव खोत (४२७), अडते व्यापरी मतदारसंघ प्रतिनिधी गटातून- सागर सुनिल मुसळे (६६२), संजय बाबुराव वठारे(६६२), हमाल व मापाडी मतदार संघ प्रतिनिधी गटातून- नितीन विष्णू चव्हाण (४३) अशी विजयी उमेदवारांनी मते मिळविली आहेत.
सकाळपासूनच राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या मतांचे आकडे बाहेर समजू लागताच विरोधी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी पालिका चौकातून काढता पाय घेतला. विजयाकडे घोडदौड सुरु असल्याचे कळताच महाडीक, आवाडे, कोरे, यड्रावकर, हाळवणकर, डॉ.मिणचेकर यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका चौकात गोळा होण्यास सुरवात केली. अंतिम निकाल जाहीर होताच गुलाल व फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.