किरकोळ आजारी नागरिकांची होती आहे कुचंबणा
प्रतिनिधी / पेठ वडगाव
कोरोनाचे रुग्ण पेठ वडगाव परिसरात वाढू लागल्यामुळे पेठ वडगाव शहरासह परिसरातील गावामध्ये काही खासगी डॉक्टर यांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे. यामुळे किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत पालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने दक्ष राहून अशा डॉक्टरांची माहिती घेवून कारवाईचा इशारा देणे गरजेचे आहे.
पेठ वडगाव परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याच्या भीतीने पेठ वडगाव शहर व परिसरातील काही खासगी डॉक्टर्स यांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. किरकोळ स्वरुपात आजारी असलेल्या तसेच व्याधी असलेल्या रुग्णांना उपचारासाठी कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात काही डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून अल्प फी मध्ये नागरिकांची तपासणी करून उपचार करत आहेत असे असताना काही डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत.
कोरोनाच्या आपत्ती काळात प्रत्येक घटक राबत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे रात्रंदिवस राबत आहेत. या परिस्थितीत आपल्याला संसर्ग होईल या भीतीने घरात बसणाऱ्या डॉक्टरांवर पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. अशा दवाखाण्यांचा सर्व्हे प्रशासनाने करून या डॉक्टरांना कारवाईची नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे मत नागरीकातून व्यक्त होत आहे.
Previous Articleसातारा : बेकायदा दारू विक्री प्रकरणी एक जण ताब्यात
Next Article सातारा : अकरावी प्रवेशाबाबत पुन्हा अचानक तपासणी









