श्री महालक्ष्मी मंदिर आवारात सुमारे सव्वाशे वर्षापासून भरणाऱ्या जनावर बाजाराची परंपरा कोरोनामुळे खंडीत
प्रतिनिधी / पेठ वडगाव
विजया दशमी दसर्याच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे भरणार्या वडगाव शेती उत्त्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस, गायी या जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होऊन सुमारे साडेपाच कोटींची आर्थिक उलाढाल झाली. या बाजारात उच्चांकी १ लाख २४ हजार रुपयांची मुर्हा म्हैस खरेदी झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर आवारात भरणारा हा जनावरांचा बाजार वडगाव बाजार समिती आवारातच भरविण्यात आला. यामुळे विजयादशमी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर आवारात भरणार्या जनावर बाजाराची सव्वाशे वर्षाची परंपरा खंडीत झाली.
पेठ वडगाव येथील विजया दशमी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद घेवून शेती काम आणि पशुधन खरेदी करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून वडगाव येथील दसर्याच्या बाजारात आहे. विजया दशमी दसर्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव काळात येणार्या वडगावच्या सोमवारच्या जनावरांचा आठवडी बाजार वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीने व श्री महालक्ष्मी देवस्थान समितीकडून दरवर्षी पेठ वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भरविण्यात येतो. मात्र या वर्षीच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा जनावरांचा बाजार श्री महालक्ष्मी मंदिर आवारात न भरता हा बाजार बाजार समितीच्या आवारातच भरविण्यात आला. कोरोनामुळे वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर आवारात भरणार्या जनावर बाजाराची सव्वाशे वर्षाची परंपरा खंडीत झाली.
या बाजारात म्हैशीमध्ये सुनिल जाधव व अनिल जाधव (रा. मिणचे,ता. हातकणंगले) यांची मुर्हा जातीची म्हैस १ लाख २४ हजार रुपयांना देवरुखचे महेश गानू यांना विक्री झाली. या बाजारात म्हीशीमध्ये मुर्हा, म्हैसाना, पंढरपुरी, गवळाट, हरियाना, जवारी, मेंढा, गुजरात, सुरती, कर्नाळी अशा सुमारे ५०० म्हैशीसह बैलामध्ये खिल्लारी, देशी, कोकणी, कर्नाटक, म्हैसूर असे बैल विक्रीस आले होते. गायीमध्ये होस्टन, साधी, क्रॉस असे गायी व बैल मिळून १ हजार बैल व गायी विक्रीस आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी विविध जातींचे उच्चांकी किमतीचे आकर्षक बैल जोडी विक्रीस न आल्याने बैल बाजारात बैल जोडी पाहण्यास येणारे शेतकरी व शौकिनांची निराशा झाली.
महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी, कर्नाटक, आंध्र या राज्यातून येणार्या जनावरांची आवक कमी प्रमाणात असल्याचे दिसून आले. जनावरांची खरेदी-विक्री दुपारपर्यंत सुरु होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी बाजारात कमी संख्येने जनावरे बाजारात आली. तर जनावरे मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री झाल्यामुळे आणि जानावरांच्या किमतीही वाढल्यामुळे सुमारे साडेपाच कोटीची आर्थिक उलाढाल झाली. साखर कारखाना हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलांची आवक चांगली झाली होती. दरम्यान खंडेनवमीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्याभरलेल्या बाजारातही शेळी, मेंढी खरेदी विक्रीची सुमारे एक कोटी रुपयांवर उलाढाल झाली. या बाजारात जनावरांना लागणार्या सापत्या, काठी, घुंगरू, रेबीन, दोर्या, तुळशीच्या माळा, विक्रीसाठी आल्या होत्या.शेतकर्यांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.
या बाजाराच्या नियोजनासाठी सचिव आनंदराव पाटील यांचेसह बाजार समिती कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी जनावरे घेवून येणार्या वाहनांचे वाहतुकीचे नियोजन केले.