पेठ वडगाव / प्रतिनिधी
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून तब्बल सात महिने बंद असलेला वडगावचा सोमवारचा आठवडी बाजार येत्या सोमवार दि.२६ पासून सुरु होत आहे. या बाबत पालिका प्रशासनाने उपसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई व . जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यंचेकडील प्राप्त आदेशानुसार पुनश्च: प्रारंभ अभियान अंतर्गत कोवीड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे पालन करुन जनावरांच्या बाजारासह स्थानिक आठवडी बाजार सुरु करणेस परवानगी देत असल्याचे मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी माहिती दिली.
पेठ वडगाव शहराचा जनावरांच्या बाजारासह स्थानिक सोमवार आठवडी बाजार दि.२६ पासून सुरु होणार आहे. तब्बल सात महिण्यानंतर सुरु होत असलेल्या बाजारामुळे वडगाव शहरातील छोट्या छोट्या व्यावसाईकांचे अर्थचक्र गतिमान होणार आहे. सोमवार आठवडी बाजार सुरु होत असताना याबाबतच्या काही मागदर्शक सूचना जाहीर करणेत आलेल्या आहेत. यास अनुसरुन सर्व व्यापऱ्यांनी सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामध्ये दोन विक्रेत्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर म्हणजे सुरक्षित सामाजिक अंतर बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी एकावेळी एकच ग्राहक समोर असेल याची व नागरीकांनीही एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक विक्रेत्यांने मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड व ग्लोव्हज वापरणे बंधनकारक आहे. नो-मास्क नो गुडस, नो मास्क नो सर्व्हीस तसेच नो-मास्क – नो एंट्री चे फलक लावणे व्यापारांना बंधनकारक करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यापाऱ्यांनी बाजारात विक्रीस बसू नये. नागरिकांनी बाजारामध्ये अनावश्यक गर्दी करु नये व सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये. सर्व नागरीकांनी बाजारात येताना मास्क वापरणे बंधनकारक असेल. ६० वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व लहान मुले यांनी बाजारात प्रवेश करु नये. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, गुटखा, तंबाखू, मावा – सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधीत असेल.
व्यापारी व ग्राहक यांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने बाजार परिसरामध्ये आणण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली असून वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावयाची आहे. ज्या व्यापारी व नागरीक यांचेकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांचेवर कडक दंडात्मक कारवाई करणेत येईल याची सर्व नागरीक व व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले आहे.
Previous Articleउत्तर कर्नाटक पूर: ६.३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
Next Article पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त!









