साठ वर्षांपूर्वी आम्ही ज्या प्राथमिक शाळेत (सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक विद्यालय) शिकलो तिला पेठेतली शाळा न म्हणता पेठांमधली शाळा म्हणायला हवं. पेशवाईतल्या सरदार रास्ते यांच्या अवाढव्य वाडय़ाच्या मुख्य दारासमोर जुन्या नागेश पेठेकडे जाणारा रस्ता आहे, डाव्या प्रवेशद्वारातून रास्ता पेठ येते, उजवीकडे सोमवार पेठ आहे. मुख्य दाराच्या डोक्मयावर आमची तीन मजली शाळा होती. वाडय़ाच्या इमारतीचा तेवढाच भाग अद्याप जसाच्या तसा आहे. देवळय़ा, खिडक्मया, कमानी, महिरपी…
या शाळेत मी तीन वर्षे शिकलो. दुसरीत आणि तिसरीत असताना तळमजल्यावर वर्ग होता. चौथीचा वर्ग वरच्या मजल्यावर होता. दुसरीत असताना अ तुकडी मिळाली ती तशीच राखून ठेवली. त्यामुळे तिन्ही वर्षे केळकर नावाच्या बाईंच्या हाताखाली शिकायला मिळालं. गोऱयापान केळकरबाई नऊवारी साडी नेसायच्या. सगळे विषय त्याच शिकवायच्या. बाईंनी मुलांना कधी मारलेले आठवत नाही. खोडय़ा केल्या तर जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे भिंतीजवळ उभे रहायचे. ‘बाई पाय दुखतात,’ म्हणून गळा काढला की बाई पुढची शिक्षा माफ करायच्या. फारच गंभीर गुन्हा झाला तर एखाद्या विद्यार्थ्याला अंगठे धरून उभे करीत.
इथेच आम्ही पुस्तीलेखन शिकलो. तो ‘तास’ असेल त्या दिवशी शाईची दौत आणि बोरू (कोवळय़ा बांबूची लेखणी) न्यायचो. दौतीतली शाई हमखास दप्तरात गळायची. खाकी सदऱयाला लागलेले शाईचे डाग पुढे काही दिवस मिरवावे लागत. कारण तेव्हा सनलाईट नावाचा एकच साबण होता. त्याने ते डाग लवकर निघत नसत.
मधल्या सुट्टय़ा दोन होत्या. एक पाणी प्यायची सुट्टी आणि दुसरी डबा खायची सुट्टी. मुलं गोल स्टीलचे डबे आणीत. डब्यातल्या भाज्या ठरावीक असत. बटाटा, भेंडी, गवार, घेवडा. काही वेळा भाजीतल्या अतिरिक्त तेलामुळे डब्यातल्या पोळय़ा भिजून खराब होत. काही मुलं अनेकदा भाजीऐवजी तूप-साखर आणायची.
मधल्या सुट्टय़ा आणि शाळा सुटायची वेळ झाली की गोविंदा शिपाई घंटा वाजवायचा. दुसरी-तिसरीच्या वर्गातून घंटा दिसायची. गोविंदा पाच मिनिटे आधी घंटेपाशी येऊन उभा रहायचा. तो दिसला की आमची चुळबूळ सुरू व्हायची.
शाळेची इमारत अजून तश्शीच आहे. एकदा कोणाची तरी ओळख काढून तिथं जायचंय. त्या वास्तूला कडकडून भेटायचंय.