भारतापाठोपाठ अमेरिकेचीही घोषणा – राखीव भांडारातील कच्चे तेल विक्रीसाठी उपलब्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना सामोरे जाण्यासाठी भारत स्वतःच्या रणनीतिक तेलसाठय़ापैकी 50 लाख बॅरल्स बाजारात उपलब्ध करणार आहे. एका उच्चस्तरीय अधिकाऱयाने मंगळवारी याची घोषणा केली आहे. तर यासंबंधीची अधिकृत घोषणा कुठल्याही क्षणी होण्याची अपेक्षा आहे. भारतापाठापोठ स्वतःच्या रणनीतिक तेल साठय़ातून काही हिस्सा बाजारात उतरविण्याची घोषणा अमेरिकेनेही केली आहे. स्वतःच्या रणनीतिक तेल साठय़ातून 5 कोटी बॅरल्स कच्चे तेल अमेरिका उपलब्ध करणार आहे. हा निर्णय इंधनाचे दर खाली आणण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. कच्च्या तेलाचा आपत्कालीन साठा उपलब्ध करण्याची योजना अमेरिकेने भारत, जपान, चीनसमवेत अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत मिळून तयार केली आहे. या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर 2 किंवा 3 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
भारताच्या पूर्व तसेच दक्षिण किनाऱयावर तीन ठिकाणी सुमारे 3.8 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. यातील 50 लाख बॅरल्स 7-10 दिवसांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हा साठा मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआयपीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेडला (एचपीसीएल) विकला जाणार आहे. या दोन्ही रिफायनरी पाईपलाईनच्या माध्यमातून रणनीतिक साठय़ाशी जोडल्या गेल्या आहेत. पुढील काळात अधिक साठा बाहेर काढला जाऊ शकतो. तर चीनने देखील स्ट्रटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल विक्रीसाठी उपलब्ध करण्याची तयारी केली आहे.
दिलासा मिळण्याची शक्यता
कच्च्या तेलाचा दर सध्या 80 डॉलर्स प्रति बॅरलसमीप आहे. अमेरिका, भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी जर स्टॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल विक्रीसाठी उपलब्ध केल्यास कच्च्या तेलाच्या किमती तात्पुरत्या काळासाठी कमी होऊ शकतात. याचा थेट प्रभाव भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर दिसून येऊ शकतो. पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून दोन हिस्स्यांमध्ये अंमलबजावणी
जगातील सर्वात मोठय़ा कच्चे तेलग्राहकांकडून किमतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा एक अभूतपूर्व आणि संयुक्त प्रयत्न आहे.5 कोटी बॅरल्सपैकी 3.2 कोटी बॅरल्स अमेरिकन स्ट्रटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हपैकी पुढील अनेक महिन्यांमध्ये एक एक्सचेंजच्या स्वरुपात जारी करण्यात येईल. तर 1.8 कोटी बॅरल्स कच्चे तेल पूर्वीपासून अधिकृत विक्रीद्वारे त्वरित उपलब्ध करण्यात येणार आहे.
प्रसंगी आणखीन पावले उचलू
डिसेंबरच्या मध्यापासून वर्षाच्या अखेरपर्यंत कच्चे तेल उपलब्ध करण्यास सुरुवात होऊ शकते. प्रशासन गरज भासल्यास आणखीन पावले उचलण्यास तयार असल्याचे बायडेन प्रशासनाकडून म्हटले गेले. या घोषणेनंतर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडची किंमत 1.5 टक्क्यांनी कमी होत 75.61 डॉलर्स प्रति बॅरल झाली आहे.
आयईएच्या 29 सदस्यांकडे राखीव साठा
भारतासह इंटरनॅशनल एनर्जी एजेन्सीच्या (आयईए) 29 सदस्य देशांकडे रणनीतिक तेलसाठा आहे. यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि ऑस्ट्रेलिया सामील आहे. हे देश 90 दिवस पुरेल इतका तेल भांडार राखून ठेवतात. चीन आणि अमेरिकेनंतर जपानकडे सर्वात मोठा आपत्कालीन तेल भांडार आहे.
ओपेक प्लसचा विरोध
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी ऑर्गनायजेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज प्लस (ओपेक प्लस)ला महामारी कमी झाल्याने कच्च्या तेलाची मागणी वाढल्यामुळे पुरवठा वाढविण्याची सूचना केली होती. पण ओपेक प्लसने बायडेन प्रशासनाच्या या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते. यानंतरच बायडेन प्रशासनाने अन्य देशांसोबत मिळून स्ट्रटेजिक ऑईल रिझर्व्हमधून कच्चे तेल विक्रीस काढण्याची योजना आखली आहे. अशाप्रकारे ग्राहक देशांनी एकत्र येत तेलाचा राखीव साठा विक्रीसाठी उपलब्ध करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असणार आहे.
ओपेक अन् ओपेक प्लस देश
ओपेक देशांच्या व्यतिरिक्त कच्च्या तेलाची निर्यात करणाऱया देशांना ओपेक प्लस देश म्हटले जाते. ओपेक प्लस मध्ये रशिया, ओमान, मेक्सिको, मलेशिया समवेत 10 देश सामील आहेत. तर ओपेकमध्ये इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात समवेत 13 देश आहेत.









